चाळीसगाव
अतिक्रमण काढण्याच्या शासकीय कारवाईदरम्यान चाळीसगाव शहरात प्रशासनाच्या पथकावर हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २३ मे) दुपारी दोनच्या सुमारास घडली. अण्णाभाऊ साठे जलतरण तलावाच्या मागील भागात, डोंगरी तितुर नदीच्या काठावर सुरू असलेल्या अतिक्रमण हटविण्याच्या कामात अडथळा आणत नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की आणि धमकी देत दगडफेक करण्यात आली.
नगरपालिका मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या नेतृत्वाखालील पथक अतिक्रमण काढण्याचे काम करत असताना, सोमा चौधरी यांनी जोरदार विरोध केला. "हे शासकीय काम आहे, विरोध करू नका," असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केल्यानंतरही सोमा चौधरी यांनी मोठ्या आरडाओरड करत कर्मचाऱ्यांना उद्देशून "तुमच्या नोकऱ्या ठेवणार नाही," अशा धमक्या दिल्या.
यानंतर सोमा चौधरी यांनी हातातील दगड घेऊन जेसीबी मशीनवर फेकले. या दगडफेकीत जेसीबीच्या काचा फुटून नुकसान झाले. तसेच, नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर जात शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यात आली.
या प्रकरणी नगरपरिषदेचे कर्मचारी दिनेश जाधव यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात सोमा चौधरी यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा, मारहाण, दमदाटी व इतर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment
0 Comments