Type Here to Get Search Results !

अंबरनाथ, बदलापूरकरांना रेल्वे धरते गृहीत, खच्चून गर्दी, चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती...मध्य रेल्वेच्या नियोजनशून्य कारभाराचा प्रवाशांना फटका

मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक 


Badlapur Ambernath Local Train : अंबरनाथ आणि बदलापूरमधील रेल्वे प्रवाशांची संख्या वाढत आहे. अपुऱ्या रेल्वे फेऱ्यांमुळे प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागतो. रेल्वे प्रशासनाकडून सुविधा मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. रेल्वे प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये असंतोष आहे.


बदलापूर : अंबरनाथ, बदलापूर शहरांतून सर्वाधिक नोकरदार रेल्वेने प्रवास करत असून, दिवसेंदिवस या प्रवासीसंख्येत वाढ होत आहे. मात्र, गर्दीच्या वेळी रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे प्रवाशांना गर्दीने खच्चून भरलेल्या लोकलमधून प्रवास करावा लागत आहे. दररोज होणारे लहानमोठे अपघात आणि सततच्या मागणीनंतरही वाढीव रेल्वे फेऱ्या आणि मूलभूत सुविधांबाबत रेल्वे प्रशासन अंबरनाथ, बदलापूरकरांना गृहीत धरत असल्याची खंत प्रवासी आणि संघटनांनी सोमवारी व्यक्त केली.


मध्य रेल्वेच्या नियोजनशून्य आणि ढिसाळ कारभाराचा फटका अनेकदा प्रवाशांना सहन करावा लागतो. गेल्या काही काळात अंबरनाथ, विशेषतः बदलापूरकरांच्या समस्यांमध्ये भर पडली आहे. प्रवासी आणि रेल्वे प्रवासी संघटनांना विश्वासात न घेता करण्यात येणाऱ्या नियोजनामुळे फलाट आणि पादचारी पुलांवर प्रवाशांना सुटसुटीत मार्गाऐवजी चेंगराचेंगरीसदृश परिस्थितीतून प्रवास करावा लागत आहे.


अनेक भागांत शेडअभावी प्रवाशांना ऊन-पावसात उभे राहावे लागते. यातच मागील काही दिवसांपासून लोकल उशिराने धावण्याचे प्रकार वाढले आहेत. बदलापूर स्थानकाची क्षमता कमी असल्याने एखादी लोकल पाच मिनिटे जरी उशिराने आली तरी पुढच्या लोकलचे प्रवासी स्थानकात येतात. त्यामुळे अभूतपूर्व गर्दी होते. मात्र बदलापूर स्थानकावरून श्वास कोंडणारा प्रवास करणारे हजारो प्रवासी व प्रवासी संघटनांच्या मागण्यांकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच, भविष्यात मुंब्र्यासारखी एखादी घटना घडल्यावरच रेल्वे प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.


प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा नागरिकांना त्रास
बदलापूर स्थानकावर वाढणाऱ्या गर्दीमुळे लोकलमध्ये चढताना प्रवासी रोजच जखमी होत आहेत. दोनच दिवसांपूर्वी सकाळी ६.५२ मिनिटांच्या लोकलमध्ये चढताना एक प्रवासी खांबाला धडकला. यात त्याचे नाक फुटून तो रक्तबंबाळ झाला. लोकलचा प्रवास दिवसेंदिवस अधिक असुरक्षित होत चालला आहे - एम. नरेकर, प्रवासी, बदलापूर


रेल्वेसंबंधी समस्या, गर्दीची स्थिती आणि नव्या लोकल गाड्यांबाबत आम्ही रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने मागणी करत आहोत. कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वेमंत्री, रेल्वे व्यवस्थापकांना यासंदर्भात निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, याची दखल घेण्यात आलेली नाही, अशी माहिती कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष, राजेश घनघाव यांनी दिली आहे.
 

Post a Comment

0 Comments