मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
चाळीसगाव : शहरातील प्रमुख व्यापारी संकुलांची स्वच्छता व सुविधा व्यवस्था पूर्णतः कोलमडल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. कचरा, दुर्गंधी, पार्किंगचा अभाव यामुळे व्यापारी व नागरिक अक्षरशः हैराण झाले असून, नगर परिषद प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
बजाज कॉम्प्लेक्स, गणेश कॉम्प्लेक्स, गायत्री कॉम्प्लेक्स, अष्टभुजा कॉम्प्लेक्स, नगर परिषद कॉम्प्लेक्ससह विविध व्यापारी संकुलांमध्ये मूलभूत सुविधा ठप्प झाल्या आहेत. प्रत्येक गाळ्यांपुढे वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो आहे. कर नियमित भरूनही सुविधा मिळत नसल्याची व्यापाऱ्यांची खंत व्यक्त होत आहे.
कचरा व दुर्गंधीचा प्रचंड त्रास
नगर परिषदेच्या निष्क्रियतेमुळे संकुल परिसरात कचऱ्याचे ढीग पडून अस्वच्छता वाढली आहे. वारंवार तक्रारी करूनही स्वच्छतेकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप व्यापारी करत आहेत. दुर्गंधीमुळे ग्राहक इतर ठिकाणी वळू लागल्याने व्यापारावर गंभीर परिणाम होत आहे. शहराची व्यापारी ओळख धोक्यात येत असल्याची भीती निर्माण झाली आहे.
स्वच्छतागृहांची बिकट परिस्थिती
अनेक संकुलांतील सार्वजनिक स्वच्छतागृहे बंद पडली आहेत. काही ठिकाणी तुटकी व पाण्याअभावी वापरता न येणारी स्थिती निर्माण झाली आहे. विशेषत: महिला ग्राहकांसाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने मोठी गैरसोय होत आहे.
पार्किंगची जागा गायब? — व्यापाऱ्यांचा आरोप
संकुलांसाठी आरक्षित पार्किंग जागा मोडतोड किंवा अवैध बांधकाम करून विकल्याचा व्यापाऱ्यांकडून आरोप करण्यात आला आहे. परिणामी संपूर्ण शहरात पार्किंगची तीव्र समस्या निर्माण झाली असून वाहतूक कोंडीत मोठी वाढ झाली आहे.
सुरक्षा व प्रकाश व्यवस्थेचाही आभाव
ड्रेनेज समस्या, तुटके पथदीप, सुरक्षेची कमतरता—यामुळे व्यापारी आणि ग्राहक दोघांचेही हाल होत आहेत. वाढत्या असुरक्षिततेमुळे व्यापारी रोष पंचावल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
तत्काळ उपाययोजनांची मागणी
व्यापारी महासंघ व स्थानिक व्यापारी संघटनांनी पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत—
• नियमित साफसफाईचे नियोजन
• सर्व संकुलांत शिस्तबद्ध पार्किंग व्यवस्था
• सार्वजनिक स्वच्छतागृह दुरुस्ती
• कचरा व्यवस्थापनात सुधारणा
• सुरक्षा आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था
“आम्ही कर वेळेवर भरतो, मग सुविधा कुठे?” — असा संतप्त प्रश्न व्यापाऱ्यांकडून विचारला जात आहे.
नगर परिषद प्रशासनाने या गंभीर समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन ठोस कारवाई करावी, अशी सर्व व्यापाऱ्यांकडून मागणी केली जात आहे. आता प्रशासन जागे होते का? याकडे शहराचे लक्ष लागले आहे…!

Post a Comment
0 Comments