मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. आज मतदान सुरू असतानाच निकाल तब्बल १९ दिवसांनी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण राज्यातील काही ठिकाणची निवडणूक स्थगित करण्यात आली असून त्या ठिकाणची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे सर्वच मतदारसंघांचे निकाल एकाच दिवशी घोषित करण्याचा पर्याय निवडणूक आयोगासमोर आहे.
या संदर्भात मुंबई उच्च न्यायालय आज दुपारी महत्त्वाचा निर्णय देणार आहे. यामुळे मतदान सुरू असतानाच ‘निकाल कधी लागणार?’ याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे.
आज सकाळपासून राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळपर्यंत लाखो उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. निवडणूक आयोगाने यापूर्वी घोषित केल्याप्रमाणे या निवडणुकीचा निकाल उद्या म्हणजेच ३ डिसेंबरला लागणार होता. मात्र मतदानाच्या दिवशीच हायकोर्टातून समोर आलेल्या माहितीनंतर चित्र पालटले आहे.
राज्यातील अनेक प्रभागांमध्ये मतदारसंख्या, आरक्षण आणि प्रभागनिहाय तक्रारींबाबत अनेक याचिका मुंबई उच्च न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठात दाखल झाल्या आहेत. या घोळांमुळे काही ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.
उर्वरित ठिकाणी आजचे मतदान सुरळीत सुरू आहे आणि या भागांचा निकाल ३ डिसेंबरलाच लागू शकतो, असे आयोगाने पूर्वी सांगितले होते.
मात्र ज्या ठिकाणी मतदान पुढे ढकलले आहे, तिथे २० डिसेंबरला मतदान होणार असून निकाल २१ डिसेंबरला लागेल. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद खंडपीठाने एक थेट प्रश्न विचारला आहे—
“राज्यातील सर्वच ठिकाणांचे निकाल २१ डिसेंबरला एकत्रितपणे घोषित करता येतील का?”
या संदर्भात निवडणूक आयोगाला आज दुपारी साडेबारा वाजेपर्यंत निवेदन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यानंतरच राज्याचा अंतिम निकाल ३ डिसेंबरला लागणार की २१ डिसेंबरला पुढे ढकलला जाणार, यावर मोठा निर्णय होणार आहे.

Post a Comment
0 Comments