मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
वराही फार्म्स प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून तब्बल ३० लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यापाऱ्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शेतमाल खरेदी-विक्री व्यवहारात फसवणुकीच्या वाढत्या प्रकाराबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून संबंधित आरोपींची चौकशी करण्यात येत आहे.
फिर्यादी योगेश अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, वराही फार्म्स प्रा. लि. ही कंपनी शेतकऱ्यांकडून मका, कडधान्य, अडूक, कांदा आदी शेतीमालाची खरेदी करत होती. खरेदी केलेला माल प्रक्रिया करून पुढे बाजारात विक्री केला जात होता. या व्यवहारासाठी प्रसाद कन्हासिंग तसेच एस. एस. ट्रेडर्सचे मालक सुनील रमेशचंद्र केडिया (रा. केडिया भवन, अकोला रोड, खामगाव, जि. बुलढाणा) यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता.
व्यवहाराच्या सुरुवातीला संबंधित व्यापाऱ्याने “माल आधी पाठवा, त्यानंतर संपूर्ण रक्कम अदा करतो,” असे आश्वासन दिले. या आश्वासनावर विश्वास ठेवून वराही फार्म्सकडून ७ नोव्हेंबर २०२४ रोजी मोठ्या प्रमाणावर शेतीमाल पाठवण्यात आला. दररोज सुमारे २९ हजार ३०० किलो मका रोडलाईन्सच्या एका ट्रकद्वारे पाठवण्यात येत होता. माल वेळेत आणि सुरळीतरीत्या पोहोचवण्यात आला, मात्र त्यानंतरही पैसे मिळाले नाहीत.
माल पोहोचल्यानंतर फिर्यादीकडून वारंवार फोन, संदेश तसेच प्रत्यक्ष संपर्क साधून रकमेची मागणी करण्यात आली. मात्र संबंधित व्यापाऱ्याने विविध कारणे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली. अखेर दीर्घकाळ पाठपुरावा करूनही रक्कम न मिळाल्याने एकूण ३० लाख ५५ हजार ४८० रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
इतकेच नव्हे तर पैसे मागितल्यावर उलट खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी सुनील केडिया, ललित केडिया व वहिनी अनिता केडिया यांनी संगनमताने विश्वासघात करून फसवणूक केल्याचा आरोप असून, त्यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आर्थिक व्यवहारांचे सखोल परीक्षण करण्यात येत आहे.

Post a Comment
0 Comments