Type Here to Get Search Results !

चाळीसगावात रेणुराई गोंधळी समाजाची भव्य शिवजयंती; जय भवानी-जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दणाणला!

 


मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 
संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक 
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283


रेणुराई गोंधळी समाज बहुउद्देशीय संस्था व विजय सपकाळे मित्रमंडळातर्फे मोठ्या उत्साहात शिवजयंती महोत्सव संपन्न

चाळीसगाव येथे रेणुराई गोंधळी समाज बहुउद्देशीय संस्था व विजय सपकाळे मित्रमंडळातर्फे गुरुवार, दिनांक 19 फेब्रुवारी 2019 रोजी घाट रोड येथील पोलीस चौकी शेजारी शिवजयंती उत्सव अत्यंत जल्लोषात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. संपूर्ण परिसर भगव्या पताकांनी, फुलांच्या तोरणांनी आणि आकर्षक रोषणाईने सजविण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. युवा नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नवनिर्वाचित नगरसेवक अभिषेक राजीव देशमुख, सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक शेखर दादा देशमुख तसेच राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अविनाश नाना देशमुख यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आदर्शांचा समाजाने अवलंब करावा, असे आवाहन केले.

यानंतर देशभक्तीपर व शिवभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले. नंदू घुले यांनी “गरजा महाराष्ट्र माझा” व “शूर आम्ही सरदार” ही गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रसिद्ध गायक सुभाषित जाधव, विकी शिंदे व विनोद परदेशी सर यांनी आपल्या सुमधुर आवाजात गीतांची मैफल रंगवली. शीघ्रकवी रमेश पोतदार यांनी प्रभावी शिवगीते सादर करून कार्यक्रमाची उंची वाढवली. प्रत्येक सादरीकरणाला प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक एकात्मता, शिक्षण, क्रीडा व समाजसेवा या क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्तींना गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विजय सपकाळे, अभिषेक देशमुख व शेखर देशमुख यांनी मनोगत व्यक्त करत शिवजयंतीसारखे उपक्रम समाजातील ऐक्य आणि प्रेरणा वाढवतात, असे मत व्यक्त केले.

रेणुराई गोंधळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे विशेष कौतुक
रेणुराई गोंधळी समाज बहुउद्देशीय संस्था ही केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमापुरती मर्यादित नसून शिक्षण, सामाजिक बांधिलकी, गरजूंची मदत, युवकांना मार्गदर्शन आणि समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. समाजातील वंचित घटकांसाठी विविध उपक्रम राबवून संस्था सामाजिक जबाबदारी पार पाडत आहे. शिवजयंती महोत्सवासारख्या भव्य कार्यक्रमातून संस्थेची संघटनशक्ती, नियोजनबद्धता आणि समाजातील सक्रिय सहभाग दिसून आला. संस्थेच्या कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी विशेष प्रशंसा व्यक्त केली.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मिलिंद दादा देशमुख (उपाध्यक्ष, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी), सुनील देशमुख (संचालक, राष्ट्रीय शिक्षण प्रसारक महामंडळ, चाळीसगाव), गफूर दादा शेख (अध्यक्ष, मुस्लिम समाज), पत्रकार, संपादक, सामाजिक कार्यकर्त्या व शिवसेना सदस्या सौ. सुनीता ताई राजेंद्र महाडिक, बाबासाहेब भोसले (माजी सरपंच, पिंपरखेड), रावसाहेब पाटील (पहिलवान, वाकडी), शालिक पाटील (मॅनेजर, औद्योगिक वसाहत), सुनील गायकवाड, सुभाष पैलवान गायकवाड, अनिस शेख, शेख सुभाष भाऊ राठोड, दिलीप राठोड, ज्ञानेश्वर साळुंखे, सोनाराप्पा, मंगेश शेठ शेंडे, अगोने दादा आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय सपकाळे यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन रेणुराई गोंधळी समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेश पैलवान गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमानंतर चहा पाण्याचा कार्यक्रम पार पडला.

या उत्सवाला पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. “शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी, जय शिवाजी” अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला आणि शिवभक्तीचा अभिमान जागवणारा हा सोहळा संस्मरणीय ठरला.




















Post a Comment

0 Comments