मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
पाचोरा तालुक्यातील नांद्रा परिसरासह गिरणा नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू तस्करीने आता गंभीर आणि धोकादायक स्वरूप धारण केले असून संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या तसेच रात्रीच्या अंधारातही सुरू असलेल्या या बेकायदेशीर वाळू उपशामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
माहितीनुसार, वाळू माफिया खुलेआम ट्रॅक्टर, डंपर आणि इतर वाहनांच्या माध्यमातून वाळूची चोरी करत असून त्यांना कोणाचाही धाक उरलेला नाही. उलट, विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना धमक्या देणे, मारहाण करणे असे प्रकारही घडत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. काही ठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात होणारी वाहनांची ये-जा, कर्णकर्कश आवाज आणि धुळीमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य व शांतता धोक्यात आली आहे. लहान मुले, वृद्ध आणि महिलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांचा संयम सुटत चालला आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून अवैध वाळू तस्करी तात्काळ बंद करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, या गंभीर प्रकरणामुळे महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे. आता प्रशासन जागे होणार का, की वाळू माफियांचा बेकायदेशीर कारभार असाच सुरू राहणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
निवेदन देण्याप्रसंगी मान्यवरांची उपस्थिती
निवेदन देण्याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य बापू सो. पदमसिंह पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख विनोद भाऊ तावडे, कुरंगी येथील माजी सरपंच गजानन पवार, परधाडे येथील सरपंच सचिन पाटील, वेरूळी सोसायटीचे चेअरमन विजय पोपट पाटील, युवासेना उपतालुकाप्रमुख ज्ञानेश्वर रायगड, माहिजी येथील ग्रामपंचायत सदस्य पवन पाटील, कुरंगी येथील ग्रामस्थ अमोल जाधव, कुरंगी येथील उपसरपंच सुनील नारायण पाटील, सोनू परधाडे, माहिजी येथील ग्रामस्थ दीपक गायकवाड, तसेच शुभम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.




Post a Comment
0 Comments