मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
रविकिर्ती संस्कृत अध्ययन केंद्र, सांगली यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय संस्कृत मेधा शोध परीक्षा (इयत्ता ९ वी) २०२५-२६ चा निकाल जाहीर होताच चाळीसगाव शहरासाठी अभिमानाचा क्षण निर्माण झाला. शहरातील दोन विद्यार्थिनींनी आपल्या मेहनत, जिद्द आणि अभ्यासाच्या जोरावर थेट अव्वल स्थान पटकावत शहराचा मान उंचावला आहे.
या परीक्षेत राष्ट्रीय कन्या शाळा येथील विद्यार्थिनी जरीन गफ्फार शेख आणि अभिनव शाळा येथील विद्यार्थिनी गौरी विनोद सूर्यवंशी यांनी प्रत्येकी १०० पैकी ९४ गुण मिळवत अव्वल स्थानावर झेप घेतली. त्यांच्या या चमकदार यशामुळे केवळ त्यांच्या शाळांचाच नव्हे तर संपूर्ण चाळीसगाव शहराचा गौरव वाढला आहे.
संस्कृत विषयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये प्रेम आणि बौद्धिक क्षमता वाढावी या उद्देशाने ही परीक्षा दरवर्षी घेतली जाते. यावर्षी चाळीसगाव येथील अनुपम संस्कृत केंद्रातून एकूण ४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी ३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हा निकाल केंद्राच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक कार्याचा ठसा उमटवणारा ठरला आहे.
राष्ट्रीय कन्या शाळेतील विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी तरटे सरांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयावर भक्कम पकड निर्माण केली. विद्यार्थ्यांची अथक मेहनत, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन या त्रिसूत्रीमुळे हे यश शक्य झाले.
आजच्या काळात मुली कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत, हे या विद्यार्थिनींनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. शिक्षण, स्पर्धा आणि ज्ञानाच्या क्षेत्रात त्या आत्मविश्वासाने पुढे जात असून समाजात स्वतःची ओळख निर्माण करण्याची ताकद त्यांच्यात आहे. जिद्द, मेहनत आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवले तर मुलीही यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचू शकतात, याचा हा प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.
जरीन गफ्फार शेख व गौरी विनोद सूर्यवंशी यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक तसेच नागरिकांकडून त्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे. लवकरच जाहीर होणाऱ्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीतही या विद्यार्थिनींचे नाव झळकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आजच्या मुली ज्ञान, परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर समाजात नवी उंची गाठत आहेत आणि चाळीसगावच्या या विद्यार्थिनींचे यश त्याचेच जिवंत उदाहरण ठरत आहे.

Post a Comment
0 Comments