Type Here to Get Search Results !

“गॅसचा काळाबाजार थांबवण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय; जळगाव जिल्ह्यात अचानक धाडसत्रासाठी भरारी पथक तयार”

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283



पश्चिम आशिया प्रदेशात सध्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ नये तसेच संभाव्य टंचाई निर्माण होण्याची परिस्थिती टाळण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांना घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीतपणे उपलब्ध राहावा आणि कोणत्याही प्रकारचा अवैध वापर, साठेबाजी किंवा काळाबाजार होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष यंत्रणा सक्रिय केली आहे.


घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर, अवैध साठा किंवा काळाबाजार होत असल्याच्या काही तक्रारी प्रशासनाच्या निदर्शनास आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात विशेष भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. हे पथक जिल्ह्यातील विविध भागांमध्ये अचानक भेटी देऊन तपासणी करणार असून घरगुती गॅस सिलेंडरचा वापर नियमांनुसार होत आहे की नाही याची पडताळणी करणार आहे. विशेषतः हॉटेल, ढाबे, खानावळी, व्यावसायिक आस्थापना तसेच मोठ्या प्रमाणावर गॅसचा वापर होणाऱ्या ठिकाणी तपासण्या करून घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


या भरारी पथकात तहसीलदार, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, तसेच भारत पेट्रोलियम (बीपीसीएल), हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल) आणि इंडियन ऑइल (आयओसीएल) या गॅस कंपन्यांचे सेल्स अधिकारी, निरीक्षण अधिकारी तसेच जिल्हा पुरवठा विभागाचे निरीक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे. या पथकाद्वारे जिल्हाभर नियमित तसेच अचानक तपासण्या करून गॅस सिलेंडरचा अवैध वापर, साठेबाजी किंवा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. आवश्यक असल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाईही करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.


दरम्यान, नागरिकांनी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केवळ घरगुती कारणांसाठीच करावा आणि कोणत्याही प्रकारे त्याचा व्यावसायिक वापर करू नये, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे. गॅस पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण, तक्रार किंवा अवैध वापराची माहिती नागरिकांच्या निदर्शनास आल्यास त्यांनी तात्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.


घरगुती गॅस पुरवठ्याबाबत काही तक्रारी असल्यास नागरिकांनी 0257-2223180 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा dsojalgaon1@gmail.com या ई-मेलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रशासनाने घेतलेल्या या उपाययोजनांमुळे जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत राहण्यास मदत होईल आणि संभाव्य टंचाई किंवा काळाबाजार रोखण्यास हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments