मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
वाळू माफियांवर प्रशासनाचा बुलडोझर; धडक मोहिमेत वेग — दसेगाव दुर्घटनेनंतर कारवाईला आणखी धार
चाळीसगाव : तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अवैध वाळू उपशाच्या बेकायदेशीर धंद्याला अखेर आळा बसणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. तहसीलदार प्रशांत पाटील आणि नायब तहसीलदार एस.बी.निकुंभ यांनी “ॲक्शन मोड” मध्ये येत अवैध वाळू माफियांविरुद्ध जोरदार मोहीम हाती घेतली असून प्रशासनाने कंबर कसली आहे. रात्रीच्या अंधारात सुरू असलेला वाळूचा काळाबाजार, नदीपात्रांची होणारी लूट आणि शासनाच्या महसुलाला बसणारा फटका यावर आता कठोर कारवाई होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर दसेगाव फाट्याजवळ नुकत्याच घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण तालुका हादरला. भरधाव वाळू डंपरने दुचाकीला धडक दिल्याने १९ वर्षीय विद्यार्थिनी चंचल लांडगे हिचा जागीच मृत्यू झाला, तर तिची मैत्रीण वैष्णवी चौधरी गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळला असून अवैध वाळू वाहतुकीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले. या अपघाताने प्रशासनालाही हादरा बसला असून कारवाईला आणखी वेग देण्यात आला आहे.
तालुक्यातील गिरणा, वाघूरसह विविध नदीपात्रांमधून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने प्रशासनाकडे येत होत्या. स्थानिक नागरिक, शेतकरी आणि पर्यावरणप्रेमी यांच्याकडूनही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी स्वतः मैदानात उतरून कारवाईचा धडाका सुरू केला आहे.
गेल्या काही दिवसांत महसूल विभाग, पोलिस प्रशासन आणि खनिज विभागाच्या संयुक्त पथकाने तालुक्यातील विविध भागांत अचानक धाड टाकून अनेक वाळू वाहतूक करणारे डंपर, ट्रॅक्टर आणि यंत्रसामग्री जप्त केली आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू उपशात गुंतलेल्या माफियांचे धाबे दणाणले असून अनेकांनी आपले अवैध व्यवहार तात्पुरते थांबवले असल्याचे चित्र आहे.
तहसीलदार प्रशांत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, “कोणत्याही परिस्थितीत अवैध वाळू उपसा सहन केला जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.” त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे प्रशासनातील इतर यंत्रणांनाही बळ मिळाले आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे नदीपात्रांचे होणारे नुकसान, भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होणे आणि पर्यावरणीय समतोल बिघडण्यास आळा बसणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. शेतकरी वर्गानेही या मोहिमेचे स्वागत केले आहे.
एकूणच, एका निष्पाप विद्यार्थिनीचा बळी गेलेल्या दसेगाव दुर्घटनेनंतर प्रशासन आता खऱ्या अर्थाने जागे झाले असून अवैध वाळू माफियांवर निर्णायक कारवाईचा धडाका सुरू झाला आहे.

Post a Comment
0 Comments