मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
भिवंडी
– जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडे बु. येथील रहिवासी असलेले विजय धनराज पाटील हे सध्या भिवंडी येथील श्रीराम प्राथमिक हिंदी विद्यालयात पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.
लहानपणापासून उजव्या पायाने पोलिओमुळे दिव्यांग असतानाही त्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर M.A., B.Ed. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. पर्यटन, गड-किल्ले भटकंती आणि समाजसेवा यांची त्यांना विशेष आवड आहे. त्यांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई शिखर तब्बल तीन वेळा सर करून एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. याशिवाय शिवनेरी, पन्हाळगड, देवगिरी, सप्तश्रृंगीगड आदी अनेक किल्ल्यांची त्यांनी भटकंती केली आहे.
शिक्षक म्हणून कार्य करताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांमध्ये त्यांना सहभागी करून घेतले. भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षेत विद्यार्थ्यांनी जिल्हा व राज्य स्तरावर यश मिळवले आहे. तसेच NMMS व शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन करून अनेक विद्यार्थ्यांना यश मिळवून दिले आहे.
गेल्या सात वर्षांपासून त्यांनी "मिशन 500 कोटी" या जलक्रांती अभियानात सक्रिय सहभाग घेतला आहे. गावागावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी नाला खोलीकरण, पाणीसाठा वाढविणे आणि जनजागृती यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारामुळे गावात 2 ते 3 किलोमीटरपर्यंत नाला खोलीकरण करण्यात आले, ज्यामुळे भूजल पातळीत मोठी वाढ झाली असून विहिरींना पाणी उपलब्ध झाले आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना 2025 साली आदर्श शिक्षक पुरस्कारासह एकूण 12 विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
दिव्यांग असतानाही शिक्षण, समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे विजय पाटील हे अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.

Post a Comment
0 Comments