Type Here to Get Search Results !

चाळीसगाव हादरले! अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283


चाळीसगाव प्रतिनिधी – शहरातील रेल्वे उड्डाण पुलावर सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघाताने परिसर हादरून गेला. भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या जबर धडकेत अर्जुन अनिल नरवाडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी पूनम अर्जुन नरवाडे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, नरवाडे दाम्पत्य हे बाजार करून आपल्या घरी परतत होते. यावेळी रेल्वे पुलावरून जात असताना मागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की अर्जुन नरवाडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर पूनम नरवाडे या गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर कोसळल्या.


अपघातानंतर काही काळ परिसरात एकच गोंधळ उडाला होता. मात्र, त्याच वेळी पुलावरून जात असलेले चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन वाल्हे यांनी तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी उपस्थित नागरिकांच्या मदतीने तात्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना रस्त्याच्या कडेला सुरक्षित हलवून ॲम्ब्युलन्स पाचारण करण्यात आले आणि पूनम नरवाडे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.


नरवाडे दाम्पत्य मूळ जामनेर तालुक्यातील रहिवासी असून कामानिमित्त चाळीसगाव शहरातील डेराबर्डी परिसरात वास्तव्यास होते. या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


दरम्यान, अपघात घडवून फरार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी वाहनाचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू असून लवकरच गुन्हेगाराला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलीसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments