मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
भरधाव वाळूच्या डंपरचा कहर! १९ वर्षीय विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू — मैत्रीण मृत्यूशी झुंज देतेय
दसेगाव फाटा हादरला; संतप्त नागरिकांचा रास्तारोको, अवैध वाळू वाहतुकीविरोधात तीव्र संताप
चाळीसगाव : तालुक्यातील दसेगाव फाट्याजवळ गुरुवारी (दि. २ एप्रिल) दुपारच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर सुन्न झाला. भरधाव वेगाने धावणाऱ्या वाळूने भरलेल्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने १९ वर्षीय विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला, तर तिच्यासोबत असलेली मैत्रीण गंभीर जखमी होऊन मृत्यूशी झुंज देत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथे राहणारी चंचल नामदेव लांडगे (वय १९) ही डी. फार्मसीचे शिक्षण घेत होती. ती अत्यंत हुशार, मनमिळावू आणि स्वप्नाळू विद्यार्थीनी म्हणून ओळखली जात होती. गुरुवारी दुपारच्या सुमारास चंचल ही तिची मैत्रीण वैष्णवी वैभव चौधरी (वय १९) हिच्यासोबत दुचाकीने दसेगाव फाट्याजवळून जात होती. याचवेळी वाळू वाहतूक करणारा एक डंपर भरधाव वेगाने त्यांच्या दिशेने आला आणि दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, चंचल लांडगे हिचा जागीच मृत्यू झाला. तिच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. तर वैष्णवी चौधरी ही गंभीर जखमी झाली असून तिला तात्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
अपघातानंतर काही वेळातच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. संतप्त नागरिकांनी या घटनेविरोधात तीव्र निषेध व्यक्त करत काही काळ रास्तारोको आंदोलन केले. “दररोज या रस्त्यावरून भरधाव वेगाने वाळूचे डंपर धावत असतात. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्यामुळे निष्पाप लोकांचा बळी जात आहे,” असा आरोप नागरिकांनी केला.
अपघाताची माहिती मिळताच मेहुणबारे पोलिस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पंचनामा केला असून संबंधित डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे. “रस्त्यावर जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. डंपर चालक वेगमर्यादा पाळत नाहीत, नियमांचे उल्लंघन करतात. यावर तातडीने नियंत्रण आणले नाही तर अशा घटना पुन्हा घडतील,” अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, चंचल लांडगे हिच्या अकाली निधनामुळे तिच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. शिक्षणाच्या माध्यमातून मोठे स्वप्न पाहणारी ही तरुणी अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तिच्या मित्रपरिवारात आणि शैक्षणिक वर्तुळातही शोकसागर उसळला आहे.
नागरिकांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी करत दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच अवैध वाळू वाहतुकीवर कायमस्वरूपी लगाम घालण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशीही मागणी जोर धरत आहे.
एक निष्पाप जीव गेला… दुसरा मृत्यूशी झुंजतोय… आता तरी प्रशासन जागे होणार का?

Post a Comment
0 Comments