मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक
जनतेच्या विश्वासाचे नेतृत्व : रावसाहेब (जिभाऊ) पाटील यांच्याकडे भडगाव मतदारसंघाच्या भविष्यातील नेतृत्वाच्या आशेने पाहणारे कार्यकर्ते
जळगाव जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रावसाहेब जिभू पाटील हे आज हजारो कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासाचे केंद्रबिंदू बनले आहेत.
जिल्हाप्रमुख, शिवसेना गटनेता, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समिती सदस्य तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा-भडगावचे माजी सभापती म्हणून त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांची ओळख विकासाभिमुख आणि जनतेशी नाळ जोडलेल्या नेतृत्वाची निर्माण झाली आहे.
नगरदेवळा-बाळद गटापासून ते संपूर्ण पाचोरा-भडगाव परिसरात रावसाहेब पाटील यांनी विकासकामांसाठी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा, शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि युवकांच्या प्रश्नांसाठी घेतलेली भूमिका आणि संघटन मजबूत करण्यासाठी केलेले योगदान यामुळे त्यांचे नाव जनतेच्या मनात विशेष आदराने घेतले जाते. अनेक गावांमध्ये आजही नागरिक त्यांना "आमचे कायमचे जिल्हा परिषद सदस्य" म्हणून संबोधतात. हे संबोधन कोणत्याही पदापेक्षा मोठे असून त्यांच्या जनाधाराची साक्ष देणारे आहे.
राजकारणात अनेक नेते निवडणुकांपुरते मर्यादित राहतात; मात्र रावसाहेब पाटील यांनी वर्षानुवर्षे लोकांमध्ये राहून त्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला आहे. त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वावर सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास दृढ झाला आहे. कोणतीही समस्या असो, संबंधित विभागाशी पाठपुरावा करून ती मार्गी लावण्यासाठी ते नेहमी पुढे असतात, अशी भावना नागरिक व्यक्त करतात.
पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा व भडगाव मतदारसंघात विकासाची अनेक कामे झाली आहेत. त्याचबरोबर संघटनेत काम करणाऱ्या निष्ठावान आणि जनाधार असलेल्या नेत्यांमध्ये रावसाहेब पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. कार्यकर्त्यांमध्ये अशी चर्चा आहे की, भविष्यात मतदारसंघातील संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी रावसाहेब पाटील यांच्यावर भडगाव मतदार संघाची अधिक मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी शिवसेनेची संघटना गावागावांत मजबूत करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. हजारो कार्यकर्त्यांना एकत्र ठेवत जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आत्मीयता आणि विश्वास दिसून येतो.
युवकांना संधी देणे, नवीन नेतृत्व घडवणे, सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेणे आणि विकासकामांसाठी सातत्याने प्रयत्न करणे ही त्यांची कार्यशैली आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. भडगाव मतदारसंघातील अनेक नागरिक आणि कार्यकर्त्यांचे मत आहे की, रावसाहेब पाटील यांच्यासारख्या अनुभवी आणि जनतेशी जोडलेल्या नेतृत्वाला भविष्यात अधिक मोठी जबाबदारी मिळावी.
आज मतदारसंघात जिथे जिथे विकास, संघटन आणि जनसंपर्काचा विषय निघतो, तिथे रावसाहेब (जिभाऊ) पाटील यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या कार्याची पावती म्हणून जनतेने त्यांना मनात विशेष स्थान दिले आहे. राजकीय पदे येतात आणि जातात, मात्र जनतेच्या हृदयात निर्माण झालेले स्थान कायम राहते. रावसाहेब पाटील यांच्याबाबतही अशीच भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
येत्या काळात भडगाव मतदारसंघाच्या राजकारणात त्यांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरेल, अशी अपेक्षा अनेक कार्यकर्ते आणि नागरिक व्यक्त करत आहेत. जनसेवा, विकास आणि संघटन या त्रिसूत्रीवर काम करणारे रावसाहेब (जिभाऊ) पाटील हे आज केवळ एक नेते नसून जनतेच्या विश्वासाचे प्रतीक बनले आहेत. त्यांच्या कार्यामुळेच त्यांच्याकडे भविष्यातील प्रभावी नेतृत्व म्हणून आशेने पाहिले जात असून, त्यांच्या पुढील वाटचालीकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments