मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर हिंदवी स्वराज्याची स्थापना करून इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून १६७४ रोजी पार पाडला. हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील अभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस मानला जातो. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, चाळीसगाव विभागाच्या वतीने किल्ले मल्हारगडावर दुर्गसंवर्धनाची विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत गडावरील पुरातन पाण्याच्या टाक्याची गाळसफाई करून ऐतिहासिक जलस्रोताचे जतन करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले.
या उपक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित दुर्गसेवकांनी गडावरील पुरातन पाण्याच्या टाक्यात उतरून अनेक वर्षांपासून साचलेला गाळ, माती, दगड व कचरा बाहेर काढण्याचे काम हाती घेतले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि कठीण भौगोलिक रचनेत श्रमदान करत दुर्गसेवकांनी मोठ्या प्रमाणात गाळ बाहेर काढला. यामुळे टाक्याची जलसाठा क्षमता वाढण्यास मदत होणार असून भविष्यात पावसाचे पाणी अधिक प्रमाणात साठवले जाऊ शकणार आहे.
महाराष्ट्रातील गड-किल्ले हे केवळ दगड-मातीचे बांधकाम नसून ते आपल्या इतिहासाचे, स्वाभिमानाचे आणि पराक्रमाचे जिवंत साक्षीदार आहेत. या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने कार्यरत आहे. राज्यातील असंख्य गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम, गाळसफाई, वृक्षसंवर्धन, ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण, जनजागृती कार्यक्रम तसेच दुर्गप्रेमींना इतिहासाची माहिती देण्याचे कार्य संस्था सातत्याने करत आहे.
विशेष म्हणजे कोणत्याही शासकीय मदतीची अपेक्षा न ठेवता केवळ शिवप्रेम, इतिहासाविषयी असलेली निष्ठा आणि समाजहिताची भावना याच्या जोरावर सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते वर्षभर दुर्गसेवेत स्वतःला झोकून देतात. पावसाळा, उन्हाळा किंवा हिवाळा अशा कोणत्याही ऋतूमध्ये गड-किल्ल्यांची स्वच्छता राखणे, प्लास्टिक व कचरा हटविणे, पाण्याच्या टाक्यांची साफसफाई करणे आणि गडांवर येणाऱ्या पर्यटकांमध्ये जनजागृती करणे हे कार्य ते सातत्याने करत असतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक असलेले गड-किल्ले आजही स्वच्छ, सुंदर आणि जतन झालेल्या स्वरूपात पाहायला मिळतात.
सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष श्री श्रमिक गोजमगुंडे यांचे कार्य विशेष उल्लेखनीय मानले जाते. त्यांनी दुर्गसंवर्धनाला एक सामाजिक चळवळीचे स्वरूप दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हजारो युवक दुर्गसेवेशी जोडले गेले असून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी कार्यरत आहेत. गड-किल्ल्यांचे संरक्षण ही केवळ जबाबदारी नसून प्रत्येक शिवप्रेमीचे कर्तव्य आहे, हा संदेश त्यांनी समाजात प्रभावीपणे पोहोचविला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक दुर्गसंवर्धन मोहिमा यशस्वीपणे राबविण्यात आल्या असून राज्यभरातील दुर्गप्रेमींना त्यांनी प्रेरणा दिली आहे.
याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व दुर्गसेवकांचे कार्यही अत्यंत स्तुत्य आहे. आपल्या वैयक्तिक कामातून वेळ काढून हे दुर्गसेवक गड-किल्ल्यांच्या जतनासाठी श्रमदान करतात. अनेकदा स्वतःच्या खर्चाने प्रवास करून दुर्गसंवर्धन मोहिमांमध्ये सहभागी होतात. त्यांचे हे निस्वार्थ कार्य भविष्यातील पिढ्यांसाठी इतिहास जतन करण्याचे महत्त्वपूर्ण योगदान ठरत आहे. दुर्गसेवकांच्या अथक परिश्रमामुळे अनेक गडांवरील पाण्याच्या टाक्या, तटबंदी, प्रवेशमार्ग आणि परिसर पुन्हा स्वच्छ व सुरक्षित होत आहेत.
मल्हारगडावरील या मोहिमेदरम्यान टाक्यातील मोठ्या प्रमाणातील गाळ काढण्यात यश आले असले तरी अद्याप काही प्रमाणात गाळ शिल्लक असल्याची माहिती सह्याद्री प्रतिष्ठानचे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप घोरपडे यांनी दिली. उर्वरित गाळ काढण्याचे काम आगामी दुर्गसंवर्धन मोहिमांमध्ये पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या मोहिमेत सह्याद्री प्रतिष्ठान, चाळीसगाव विभागातील अनेक दुर्गसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सर्वांनी एकजुटीने श्रमदान करून दुर्गसंवर्धनाचा आदर्श घालून दिला. शिवराज्याभिषेक दिनासारख्या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी दिवशी राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ऐतिहासिक जलस्रोतांचे संरक्षण होण्याबरोबरच समाजात दुर्गसंवर्धनाविषयी जनजागृती निर्माण झाली आहे.
आजच्या आधुनिक काळात ऐतिहासिक वारसा जतन करणे ही काळाची गरज बनली आहे. अशा वेळी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान आणि राज्यभरातील दुर्गसेवकांनी हाती घेतलेले कार्य हे खऱ्या अर्थाने राष्ट्रसेवा आणि इतिहाससेवा मानले जात आहे. त्यांच्या या समर्पित कार्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास पुढील अनेक पिढ्यांपर्यंत जिवंत राहण्यास निश्चितच मदत होणार आहे.


Post a Comment
0 Comments