मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
जळगाव जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात चोपडा ग्रामीण पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत तब्बल ७ किलो ११६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, गांजा, कार, मोटारसायकल आणि मोबाईल फोनसह एकूण ६ लाख ८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला मोठा धक्का बसला असून, संबंधित पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११.५३ वाजता चोपडा ग्रामीण पोलीस लासूर-हातेड मार्गावरील पाटचारा परिसरात नियमित गस्त घालत होते. त्यावेळी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका कारवर पोलिसांचे लक्ष गेले. वाहन अडवून त्याची कसून तपासणी करण्यात आली असता कारमध्ये लपवून ठेवलेला ७ किलो ११६ ग्रॅम गांजा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत वाहनातील तिघांना ताब्यात घेत अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विष्णू सुभाष सुळे (वय ३७, रा. पिंप्री, जि. पुणे), प्रकाश बबन शिंदे (वय ३०, रा. टाकळीमिया, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) आणि प्रशांत ताराचंद अथाणी (वय २९, रा. टाकळीमिया, देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांचा समावेश आहे.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी १ लाख ७७ हजार १०० रुपयांचा गांजा, ३ लाख रुपयांची हुंडाई सॅन्ट्री कार, ९० हजार रुपयांची पल्सर मोटारसायकल तसेच ४१ हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल फोन असा एकूण ६ लाख ८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४६/२०२६ अन्वये अंमली पदार्थ व मन:प्रभावी पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस), १९८५ अंतर्गत कलम २०(ब) आणि २२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गांजा नेमका कुठून आणला, तो कुठे आणि कोणाला पुरविण्यात येणार होता, तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस सातत्याने कठोर कारवाया करत असून, अशा प्रकारच्या अवैध व्यवसायात सहभागी असलेल्या व्यक्तींविरुद्ध यापुढेही अधिक प्रभावी आणि धडक कारवाया सुरू राहतील, असा निर्धार पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची मोहीम आणखी तीव्र होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Post a Comment
0 Comments