मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
जळगाव/धुळे/नंदुरबार : वीज ग्राहकांच्या समस्या आणि तक्रारींचे स्थानिक पातळीवर तातडीने निराकरण व्हावे, तसेच महावितरणच्या विविध सेवा आणि योजनांची माहिती ग्राहकांना सहज उपलब्ध व्हावी, यासाठी महावितरणच्या जळगाव परिमंडलात आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिरा’चे आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी हे शिबिर घेण्यात येणार असून, त्यानुसार १७ ऑगस्ट रोजी जळगाव, धुळे आणि नंदुरबार मंडलातील सर्व उपविभागीय कार्यालयांमध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जळगाव परिमंडलातील तब्बल ५० उपविभागीय कार्यालयांमध्ये एकाच वेळी ग्राहक समाधान शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिराची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत असणार आहे. या कालावधीत ग्राहकांना आपल्या वीज समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधता येणार आहे. त्यामुळे कार्यालयीन कामकाजाच्या नेहमीच्या प्रक्रियेत तक्रारींचे निराकरण होण्यासाठी लागणारा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे.
विविध तक्रारींचे होणार निराकरण
या शिबिरामध्ये ग्राहकांच्या विविध प्रकारच्या तक्रारी आणि समस्यांवर संबंधित अधिकाऱ्यांकडून कार्यवाही करण्यात येणार आहे. यामध्ये वीजबिलातील तक्रारी, वाढीव अथवा चुकीच्या बिलासंबंधी समस्या, वीजपुरवठ्यातील अडचणी, मीटरशी संबंधित तक्रारी, नवीन वीजजोडणी, वीजजोडणीतील बदल तसेच महावितरणच्या विविध सेवांशी संबंधित प्रश्नांचा समावेश आहे.
ग्राहकांनी आपली समस्या थेट संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडल्यामुळे तक्रारीचे स्वरूप समजून घेणे आणि त्यावर योग्य कार्यवाही करणे अधिक सुलभ होणार आहे. स्थानिक पातळीवरच तक्रारींचे निराकरण करण्याचा महावितरणचा हा प्रयत्न ग्राहकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
स्मार्ट मीटरबाबतही मिळणार माहिती
सध्या अनेक ग्राहकांमध्ये स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीबाबत विविध गैरसमज आणि संभ्रम आहेत. या पार्श्वभूमीवर शिबिरात स्मार्ट मीटर कसे कार्य करते, त्यामध्ये नोंद होणाऱ्या वीज वापराची माहिती कशी मिळते आणि ग्राहकांना त्याचा काय फायदा होऊ शकतो, याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.
महावितरणने ग्राहकांना आपल्या संबंधित उपविभागीय कार्यालयात आयोजित या ‘ग्राहक समाधान शिबिरा’मध्ये सहभागी होऊन आपल्या तक्रारी मांडाव्यात आणि समस्यांचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन केले आहे.
शिबिराची माहिती :
दिवस : प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवार
वेळ : सकाळी ११ ते दुपारी १
स्थळ : संबंधित महावितरण उपविभागीय कार्यालय
पहिले शिबिर : १७ ऑगस्ट २०२६
या नियमित उपक्रमामुळे वीज ग्राहक आणि महावितरण प्रशासन यांच्यातील थेट संवाद वाढण्यास मदत होणार असून, ग्राहकांच्या तक्रारींचे जलद आणि स्थानिक पातळीवर निराकरण होण्याची अपेक्षा आहे.

Post a Comment
0 Comments