Type Here to Get Search Results !

सराफाच्या दुकानातून सोन्याचा ऐवज लांबविणारा आरोपी अकोल्यातून ताब्यात; ४.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283



भुसावळ : सराफाच्या दुकानातून हातचलाखीने सोन्याचा ऐवज लांबवून फरार झालेल्या आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेत त्याला अकोला शहरातून ताब्यात घेतले. आरोपीकडून भुसावळ तालुका आणि बोदवड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांतील एकूण ४७ ग्रॅम ४८ मिलीग्रॅम सोन्याचा, अंदाजे ४ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


भुसावळ तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. १२९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) तसेच बोदवड पोलीस ठाणे गु.र.नं. १२८/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये दाखल गुन्ह्यांमध्ये आरोपी मोहम्मद अली लियाकत अली सय्यद (वय ३८, रा. पापा नगर, खडका रोड, इरणी वस्ती, भुसावळ, जि. जळगाव) हा फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते.


दरम्यान, आरोपी अकोला शहर परिसरात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. माहितीची खातरजमा करून पथक तातडीने अकोला येथे रवाना झाले. गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला आणि त्याला ताब्यात घेण्यात आले.


ताब्यात घेतल्यानंतर आरोपीकडे गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने दिलेल्या माहितीनुसार भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील ३२ ग्रॅम ४०० मिलीग्रॅम वजनाची सोन्याची लगड, अंदाजे ३ लाख २० हजार रुपये किमतीची, पंचांसमक्ष जप्त करण्यात आली.


तसेच बोदवड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील चोरीच्या मुद्देमालाबाबत चौकशी केली असता, आरोपीने दिलेल्या माहितीनुसार १५.०८ ग्रॅम वजनाची सोन्याची रिंग, अंदाजे १ लाख ७५ हजार रुपये किमतीची, जप्त करण्यात आली. अशा प्रकारे दोन्ही गुन्ह्यांमधील एकूण ४७ ग्रॅम ४८ मिलीग्रॅम सोन्याचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.


ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले व परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. आरोपीने प्राथमिक चौकशीत दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोहेकॉ. उमाकांत पाटील, पोहेकॉ. गोपाल गव्हाळे, पोना. विकास सातदिवे, पोको. प्रशांत परदेशी, पोको. राहुल वानखेडे, पोहेका. संदिप चव्हाण, चापोको. रिजवान शेख तसेच तांत्रिक मदतीसाठी पोको. गौरव पाटील व पोको. मिलिंद जाधव यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.


अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास पोहेको. विकास यशवंत बाविस्कर करीत आहेत.

Post a Comment

0 Comments