मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
रावेर तालुक्यातील आभोडा येथे गोमांस विक्रीविरोधात रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी (७ ऑगस्ट) सकाळी धडक कारवाई केली. पोलिसांनी गावातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून सुमारे ६०० किलो मांस, दोन कुन्हाडी आणि दोन सुरे जप्त केले. तसेच कत्तलीच्या उद्देशाने आठवडे बाजार परिसरात बांधून ठेवलेल्या तीन गोवंशांची सुटका करण्यात आली. या कारवाईमुळे आभोडा परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आभोडा गावातील बसस्थानक परिसरातील एका घरात जनावरांची कत्तल करून मांस विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईदरम्यान उस्मान हसन कुरेशी (वय ४८, रा. आभोडा) याच्या ताब्यातील घरात कत्तल करून मांस कापण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ३०० किलो मांस, एक कुन्हाड आणि एक सुरा असा मुद्देमाल जप्त केला.
दुसऱ्या ठिकाणीही छापा
यानंतर पोलिसांना मिळालेल्या अन्य गुप्त माहितीनुसार आभोडा गावातील चावडी परिसरात दुसऱ्या ठिकाणीही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी इरफान रेहमान उर्फ लंगड्या कुरेशी (वय ३२, रा. आभोडा) हा कत्तल करून मांस विक्री करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच संशयित घटनास्थळावरून पसार झाला.
या ठिकाणाहून पोलिसांनी सुमारे ३०० किलो मांस, एक कुन्हाड आणि एक सुरा जप्त केला. दोन्ही ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत एकूण सुमारे ६०० किलो मांस जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या मांसाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रंजीत पाटील यांच्या उपस्थितीत नमुने घेण्यात आले. त्यानंतर जप्त मुद्देमालाची नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली. तसेच आठवडे बाजार परिसरात कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या तीन गोवंशांची पोलिसांनी सुटका केली.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
या कारवाईनंतर रावेर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पोलिसांच्या हद्दीत कुठेही गोवंश कत्तलीसाठी नेले जात असल्याचे किंवा कत्तल केली जात असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले.
ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन तसेच गुन्हे शोध पथकातील हवालदार ईश्वर चव्हाण, जगदीश पाटील, समाधान ठाकूर, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, राहुल परदेशी, विकार शेख, कॉन्स्टेबल उषा मसाणे आदींनी केली.

Post a Comment
0 Comments