Type Here to Get Search Results !

विवाहानंतर जेवणातून उंदीर मारण्याचे औषध दिल्याचा आरोप; तिघांना जीवे मारण्याचा प्रयत्न, दोन महिला ताब्यात

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165253



पारोळा तालुक्यातील वेल्हाणे येथील धक्कादायक घटना; विवाहासाठी अडीच लाख रुपयांची बोली ठरल्याची माहिती, मध्यस्थ एजंटचा शोध सुरू


पारोळा : विवाहानंतर जेवणातून उंदीर मारण्याचे औषध देऊन एकाच कुटुंबातील तिघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पारोळा तालुक्यातील वेल्हाणे येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी पारोळा पोलिसांनी तत्परतेने तपासाची चक्रे फिरवत धुळे जिल्ह्यातील निमगूळ गावाजवळून दोन महिला आरोपींना ताब्यात घेतले आहे. विवाहासाठी महिलांना आणणाऱ्या कथित मध्यस्थ एजंटचा पोलिसांकडून शोध सुरू असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


विवाहानंतर घडला प्रकार


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वेल्हाणे येथील वाल्मिक ताराचंद पाटील (वय ३२) यांचा ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सुमन सुभाष सहाणी हिच्यासोबत विवाह झाला होता. या विवाहासाठी झारखंड किंवा छत्तीसगड राज्यातून दोन आदिवासी समाजातील महिलांना मध्यस्थामार्फत आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कथित विवाह व्यवहारासाठी अडीच लाख रुपयांची बोली ठरल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, या व्यवहारामागील नेमके वास्तव काय आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.


जेवणातून विषारी पदार्थ दिल्याचा आरोप


९ ऑक्टोबर रोजी फिर्यादी गणेश ताराचंद पाटील (वय ३४), त्यांचे वडील ताराचंद शांताराम पाटील आणि आई सरलाबाई यांना जेवणातून उंदीर मारण्याचे औषध देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. संबंधित प्रकारानंतर महिला पैसे घेऊन निघून गेल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


या घटनेत विषबाधेमुळे त्रस्त झालेल्या गणेश यांच्या आई-वडिलांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमागील कारणे आणि संबंधितांचा नेमका सहभाग याबाबत पोलीस तपास सुरू आहे.


पोलिसांचा पाठलाग; निमगूळजवळ दोघींना पकडले


घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. बिट अंमलदार पोलीस हवालदार सुनील हाटकर, पोलीस शिपाई गवळी आणि पोलीस शिपाई शिंदे यांना तपासासाठी पाठवण्यात आले. तपासादरम्यान संबंधित महिला धुळे जिल्ह्याच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा माग काढत गोपनीय माहितीच्या आधारे निमगूळ गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर दोन्ही महिलांना ताब्यात घेतले.


मध्यस्थ एजंटचा शोध सुरू


या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), १२३, ३१६(२) आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमन सुभाष सहाणी आणि आरती सूर्यप्रकाश पटेल अशी ताब्यात घेतलेल्या महिलांची नावे आहेत.


विवाहासाठी महिलांना आणणाऱ्या कथित मध्यस्थ एजंटचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, विवाहासाठी झालेल्या आर्थिक व्यवहाराचे स्वरूप काय होते आणि विषारी पदार्थ देण्यामागील नेमका उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे. पोलिसांच्या पुढील तपासातून या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments