Type Here to Get Search Results !

चड्डी गँगच्या म्होरक्याला अंबरनाथ पोलिसांनी ठोकल्या बेड्या!


 मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक 
 

चड्डी गँगच्या म्होरक्याला अंबरनाथ पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
चड्डी गँगचा म्होरका जाळ्यात!
अंबरनाथ पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अंबरनाथ ता. ६ 
अंबरनाथमध्ये चड्डी गँगच्या नावाने धुमाकूळ घालणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. त्याच्यावर रायगड आणि ठाणे जिल्ह्यात चोरी प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. अंबरनाथच्या साई सागर हॉटेलमध्ये चोरी करून हे आरोपी फरार झाले होते.
अंबरनाथ पश्चिमेच्या लादीनाका बुवापाडा परिसरात राजस महेश पिसाळ यांचे साई सागर बार नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये बुधवारी (ता. ५) मध्यरात्रीच्या सुमारास दोन सराईत चोरट्यांनी अर्धनग्न अवस्थेत हॉटेलचे पत्रे तोडून आत प्रवेश करीत एकूण ७० हजारांची रोकड लंपास केली होती. दुसरी चोरी एका हार्डवेअरच्या दुकानात केली होती. या दोन्ही चोऱ्यांमध्ये दुकानांचे पत्रे तोडून आतमध्ये प्रवेश करीत चोरी केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. याप्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला असून, पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत होते. अखेर पोलिसांनी सापळा रचून या चड्डी गॅंगच्या म्होरक्याला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्याच्या इतर चार साथीदारांचा शोध सुरू आहे.
ही कारवाई गुन्हे शाखेचे डीबी पथकाचे अधिकारी नागेश्वर मुंडे, त्यांचे सहकारी सचिन जाधव, गावित, पथवे, विशे, अंमलदार दराडे, स्वप्नील पाटील यांनी केली. अंमलदार दराडे व स्वप्नील पाटील यांना गुप्तहेरांमार्फत मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सलमान यातुला शहा  याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याच्यावर कर्जत व नेरळ येथे गुन्हे दाखल असल्याचे त्याने मान्य केले. तो सराईत चोर असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले. त्याने याआधीही अर्धनग्न अवस्थेत चोरी केल्या आहेत का, याबाबतचा तपास पोलिस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments