Type Here to Get Search Results !

बळीराजासाठी आनंदाची बातमी, कोणत्या महिन्यात किती पाऊस होणार

 

मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक 

           भेंडवळच्या मांडणीतील हवामानाचा अंदाज

भेंडवळ घटमांडणीची ३५० वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे. यावर्षीच्या घटमांडणीत पावसाळ्याचा अंदाज, शेतीची स्थिती आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला अनिश्चितता असली तरी नंतर तो सर्वसाधारण राहील असे भाकित आहे.

सुमारे साडेतीनशे वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या भेंडवळ घट मांडणीचे भाकित समोर आले आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळमध्ये घटमांडणी करण्यात आली. नुकतंच भेंडवळ घट मांडणीत यंदाचा पाऊस कसा असणार, याबद्दलचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यासोबतच भेंडवळच्या घटमांडणीत शेती आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित भाकितांबरोबरच नैसर्गिक आपत्ती आणि राजकीय घडामोडींविषयीही अंदाज वर्तवण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून हे भाकित अचूक आहेत. लोकांचा या परंपरेवर दृढ विश्वास आहे. १ मे रोजी सूर्योदयापूर्वी भेंडवळीच्या घटमांडणीचे भाकीत मांडण्यात आले.

सारंगधर महाराज यांनी यावर्षीच्या पीकपाणी आणि देशाच्या स्थितीबद्दल महत्त्वपूर्ण अंदाज व्यक्त केले आहेत. यंदा पिकांची परिस्थिती सर्वसाधारण राहणार आहे. तसेच यावेळी चार महिने पाऊस कसा असेल याबद्दलचाही अंदाज मांडण्यात आला आहे. सुरुवातीचे दोन महिने अनिश्चित आणि काही ठिकाणी कमी-जास्त पाऊस राहील, असा अंदाज या भेंडवळीच्या घटमांडणीत वर्तवण्यात आला आहे. पण त्यानंतर पाऊस सर्वसाधारण राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

पावसाचा अंदाज काय?
यंदा पावसाळ्याच्या पहिल्या महिन्यात कमी अधिक पाऊस होईल. त्यानंतर दुसऱ्या महिन्यात सर्वसाधारण आणि चांगला पाऊस होईल. तसेच तिसऱ्या महिन्यात सर्वसाधारण पाऊस होईल. तर चौथ्या महिन्यात मात्र अवकाळी पाऊस येण्याची शक्यता आहे. यावर्षी सांडाई, कुरडई आणि पापड तसेच जनावरांसाठी चारा-पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध असेल, असे सकारात्मक भाकित वर्तवण्यात आले आहे.

देशावर मोठे संकट येण्याची शक्यता
सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, यावर्षी देशावर मोठे संकट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा गंभीर इशाराही देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, घट मांडणीत पान विडा गायब असल्याने याबद्दल कोणतेही भाकित करणे शक्य झाले नाही. मागील पन्नास वर्षांमध्ये अशी परिस्थिती पहिल्यांदाच उद्भवली आहे. पुरी आणि करंजी देखील गायब असल्याने भूकंप आणि नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.




Post a Comment

0 Comments