चाळीसगाव
चाळीसगाव शहरातून बेकायदेशीररीत्या वाहतूक होत असलेल्या सुमारे ७ लाख १९ हजार रुपयांच्या प्रतिबंधित गुटख्याचा साठा शहर पोलिसांनी पकडत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण १५ लाख १९ हजार २९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, नागद येथील व्यापाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अमितकुमार मनेळ यांचे विशेष कौतुक होत आहे. त्यांचे सूक्ष्म नेतृत्व, गुन्हेगारीवर बारीक लक्ष आणि कार्यतत्परता यामुळेच ही मोठी तस्करी उधळून लावणे शक्य झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पथकाने ही धडक कारवाई अंमलात आणली.
गोपनीय माहितीवरून अचूक कारवाई
शहर पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे सातच्या सुमारास हिरापूर रोडवरील राष्ट्रीय महाविद्यालयाजवळ पोलिसांनी नाकाबंदी केली. या वेळी एम.एच.४१ एयू ३२१० या महिंद्रा पिकअप वाहनाची तपासणी करण्यात आली. वाहनात ताडपत्रीने झाकून ठेवलेला सुगंधित पानमसाला आणि तंबाखूचा साठा आढळून आला.
तपासादरम्यान वाहनचालकांकडे विचारणा केली असता कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसल्याचे उघड झाले. वाहनातील गुटख्याची किंमत ७ लाख १९ हजार २९ रुपये इतकी असल्याचे स्पष्ट झाले. त्यासोबतच ८ लाखांचे वाहन देखील पोलिसांनी जप्त केले.
गुन्हा दाखल – पुरवठादारासह तिघे आरोपी
या प्रकरणी गुटखा वाहतूक करणारे सलीम मुनीर खान (२४, रा. ग्रीन पार्क, जारगाव चौफुली, पाचोरा) आणि अरबाज इब्राहीम पठाण (२२, रा. सार्वेता, पाचोरा) यांना अटक करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान त्यांनी गुटख्याचा पुरवठादार दीपक प्रविणचंद बेदमुथा उर्फ जैन (रा. नागद, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) याचे नाव उघड केले.
जळगाव जिल्ह्याचे अन्न सुरक्षा अधिकारी शरद मधुकर पवार यांच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कडक नियंत्रणाची गरज
चाळीसगाव व परिसरात प्रतिबंधित पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक सध्या अधिक सक्रीय झाले असून, यापूर्वीदेखील त्यांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कडक कारवाई केली आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे नागरिकांमध्ये विश्वास वाढला असून गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी हा पायरीचा मोठा टप्पा मानला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि गुन्हे शोध पथकाचे सर्व कर्मचारी विशेष कौतुकास पात्र ठरतात निरीक्षक अमित कुमार मनेळ यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली उपनिरीक्षक संदीप घुले पोलीस नाईक आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्चे योगेश बेलदार राहुल सोनवणे समाधान पाटील आणि अन्य कर्मचाऱ्यांनी जे दक्षता संयम आणि चिकाटीने सर्व ऑपरेशन यशस्वी केले ते खरोखरच स्तुत्य आहे.

Post a Comment
0 Comments