मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक
पाचोरा शहरात नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्री. राहुल कुमार पवार यांनी आपल्या कार्यशैलीने परिसरात सकारात्मक खळबळ निर्माण केली आहे. गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी त्यांनी सखोल उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्यांनी रात्रगस्तीत वाढ करण्याचे आदेश पोलीस दलाला दिले आहेत.
शहरातील शांतता कायम राहण्यासाठी पोलीस निरीक्षक पवार यांनी पोलीस पाटील, शांतता समिती सदस्य, महिला दक्षता समिती, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापारी वर्ग यांच्याशी संवाद साधून सहकार्याची विनंती केली आहे. “शहर हे आपले घर आहे, त्यामुळे शांतता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
पोलिस स्टेशनमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीस मान-सन्मानाने वागवण्याचे आणि कोणावरही अन्याय होऊ नये याची विशेष काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याशिवाय, घरफोडी, चोरी, अवैध धंदे, मटका, गुटखा विक्री, सार्वजनिक ठिकाणी अकारण गर्दी टाळणे या बाबतीत कठोर कार्यवाही केली जाणार आहे.
विशेष म्हणजे, श्री. पवार यांनी स्पष्टपणे सूचित केले आहे की रात्री ११ वाजल्यानंतर विनाकारण शहरात फिरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. अशा नागरिकांनी रेल्वे, एस.टी. तिकीट, किंवा सिनेमा टॉकीजचे तिकीट बाळगणे अनिवार्य आहे. कारण नसताना रस्त्यावर फिरणाऱ्यांवर संबंधित कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले जातील.
“गुन्हेगारी पायबंद घालण्यासाठी पोलीस सज्ज असून कोणत्याही प्रकारची दहशत निर्माण करणाऱ्यांना किंवा शांतता भंग करणाऱ्यांना पाचोरा परिसरात स्थान नाही,” असा इशारा त्यांनी दिला. शहरातील नागरिकांनी कायद्याचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पोलीस निरीक्षक श्री. राहुल कुमार पवार यांच्या या भूमिकेचे पाचोरा शहरात सर्वत्र स्वागत होत असून त्यांच्या बद्दल विश्वास आणि आशावाद व्यक्त केला जात आहे.

Post a Comment
0 Comments