मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक
वलठाण (ता. चाळीसगाव), दि. 15 जुलै 2025:
शासकीय केंद्रीय माध्यमिक आश्रमशाळा वलठाण येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी आज एक विशेष जनजागृती कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शंकर मुटेकर यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून विद्यार्थ्यांची सुरक्षा, व्यसनमुक्ती, सेल्फ डिफेन्स आणि विविध कायद्यांविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
मुटेकर यांनी विद्यार्थ्यांना "गुड टच आणि बॅड टच" या विषयाची ओळख करून दिली आणि अशा बाबतीत पालक, शिक्षक किंवा वसतिगृहातील वार्डन यांच्याशी मोकळेपणाने बोलण्याचे महत्व सांगितले. त्यांनी वाहतूक नियमांचे पालन, व्यसनाचे दुष्परिणाम, अल्पवयीन मुलींच्या मिसिंग/लग्न प्रकरणांमुळे उद्भवणारे कायदेशीर परिणाम, तसेच भारतीय न्याय संहिता, नागरिक सुरक्षा संहिता, साक्ष अधिनियम आणि POCSO कायदा यांची प्राथमिक माहिती दिली.
विशेषतः स्वतःची सुरक्षा आणि आत्मरक्षण (सेल्फ डिफेन्स) कसे करावे याबद्दलचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरले.
या कार्यक्रमात सुमारे 250 विद्यार्थी व विद्यार्थिनी, शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रशांत सोनजे तसेच इतर शिक्षक उपस्थित होते. उपस्थित शिक्षक व मुख्याध्यापकांनी कार्यक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण होईल व ते स्वतःची काळजी घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.



Post a Comment
0 Comments