मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
जळगाव : सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला रेल्वेत नोकरी लावून देण्याचे गोड आमिष दाखवत एका 67 वर्षीय नागरिकाची तब्बल 12 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी संतोष माणिक चौधरी (वय 67, रा. निमखेडी शिवार) यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
असे घडले प्रकरण
फिर्यादी चौधरी यांची आरोपींशी शहरातील नवीन बसस्थानकाजवळील चिमुकले राम मंदिर परिसरात ओळख झाली. विश्वास संपादन करत आरोपींनी चौधरी यांच्या मुलाला — जगदीश चौधरी — रेल्वेत नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
यासाठी 21 फेब्रुवारी 2021 ते 31 ऑक्टोबर 2025 या जवळपास चार वर्षांच्या कालावधीत आरोपींनी रोख व ऑनलाइन व्यवहारातून मिळून १५ लाख रुपये स्वीकारले.
आरोपी संदीप वसंत भोळे, दीपाली संदीप भोळे (दोघे रा. जिल्हापेठ, जळगाव), धीरज पांडुरंग मुंगलमारे (रा. भंडारा) व अण्णा नामदेवराव गोहत्रे (रा. नागपूर) या चौघांनी पैसे घेतल्यानंतर जगदीश चौधरी यांना रेल्वे सेवेत नोकरी लागल्याचा बनावट नियुक्ती आदेशही दिला.
परंतु प्रत्यक्षात कोणतीही नोकरी न लावता आरोपींनी घेतलेल्या रकमेपैकी केवळ ₹२ लाख ५० हजार परत करत उर्वरित ₹१२ लाख ५० हजार रक्कम हडप केली.
तत्पश्चात फसवणूक उघड झाल्याने फिर्यादी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Post a Comment
0 Comments