मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
मुक्ताईनगर | नगरपंचायत निवडणूक प्रचाराची धामधूम सुरू असतानाच शहरात भीतीचं सावट आणणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विष्णू गोसावी (वय २४) या तरुणाची अज्ञात स्थळी चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली असून, ही हत्या प्रेम प्रकरणातून घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून कसून चौकशी सुरू आहे.
विष्णू गोसावी हा गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. रविवारी (ता. २३ नोव्हेंबर) सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास मुक्ताईनगर शहराबाहेरील प्लॉटिंगच्या परिसरात काही नागरिकांना त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.
हत्या प्रेम वादातून?
डीवायएसपी सुभाष ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार,
> “या हत्येमागे प्रेमसंबंधातून निर्माण झालेला वाद किंवा सूडाची भावना असल्याची शक्यता तपासात पुढे येत आहे.”
या प्रकरणी आरोपी ऋषिकेश आत्माराम पवार (धनगर), वय २४ आणि आकाश आत्माराम पवार (धनगर) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विष्णू कोणत्या व्यक्तींच्या संपर्कात होता, तो बेपत्ता झाल्यानंतर त्याला कुठे नेण्यात आले, याचा सखोल तपास सुरू आहे.
शहरात भीतीचं सावट
घटनेनंतर मुक्ताईनगरात तणावपूर्ण वातावरण पसरले आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून रात्री उशिरापर्यंत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलिसांनी खुनामागील सर्व पैलूंवर तपासाचे चक्र फिरवले असून, सत्य लवकरच समोर येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्याची शहरातील नागरिक अपेक्षा व्यक्त करत आहेत.

Post a Comment
0 Comments