मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
देशभरात अवैध शस्त्रनिर्मितीसाठी कुप्रसिद्ध ठरलेल्या मध्य प्रदेशातील उमर्टी गावावर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत गुन्हेगारीला मोठा चाप लावला आहे. अवघ्या एका गावातून गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रासह गुजरातमध्ये ८०० हून अधिक गावठी पिस्तुले पुरवण्यात आल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
पुण्यातील शरद मोहोळ व माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर झालेल्या हत्याकांडांसह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये याच गावातील शस्त्रांचा वापर झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गरज भासल्यास पुन्हा कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला.
या धाडीत पुणे पोलिसांच्या पथकाने तब्बल ५० भट्या उद्ध्वस्त केल्या असून ४७ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी १० जणांना अटक करण्यात आली आहे. पिस्तुले, जिवंत काडतुसे आणि शस्त्रनिर्मितीसाठी लागणारा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.
या मोहिमेत १५० हून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मानही करण्यात आला. कारवाईमध्ये मध्य प्रदेश पोलिस व एटीएसचे महत्त्वपूर्ण सहकार्य मिळाले असल्याची माहितीही देण्यात आली.
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, या अवैध शस्त्रपुरवठ्याच्या साखळीचा पूर्णपणे बंदोबस्त करण्यात येणार असून, गुन्ह्यांमध्ये शस्त्र पुरवणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कठोर शिक्षा करण्यात येणार आहे.
या कारवाईने गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली असून, अवैध शस्त्रनिर्मितीच्या रॅकेटला मोठा धोका निर्माण झाला आहे. देशभरात अशा शस्त्रनिर्मितीविरोधात ही मोहीम निर्णायक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पुणे पोलिसांनी उमर्टीतील अवैध शस्त्रनिर्मितीवर केलेली कारवाई अत्यंत धाडसी आणि कौतुकास्पद आहे. गुन्हेगारी साखळी उद्ध्वस्त करून शेकडो जीव वाचवण्याचे काम त्यांनी केले आहे. मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने केलेल्या या मिशनमुळे कायद्याचा धाक अधिक मजबूत झाला आहे.

Post a Comment
0 Comments