Type Here to Get Search Results !

अकलूज परिसरात ‘१० टक्के परतावा’ आमिषातून कोट्यवधींची आर्थिक फसवणूक; अनेक जिल्ह्यांतील गुंतवणूकदार बाधित, अकलुज पोलिसांत गंभीर गुन्हा दाखल

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 927316283



अकलूज (ता. माळशिरस) : अकलूज शहर व परिसरासह सोलापूर, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांना दरमहा १० टक्के परताव्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट होत आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


अकलूज येथील एका महिला गुंतवणूकदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, नवनाथ जगन्नाथ अवताडे, शुभम नवनाथ अवताडे, सुवर्णा नवनाथ अवताडे (मूळ रा. फळवणी, ता. माळशिरस, सध्या बिबवेवाडी, पुणे) तसेच अशोक आगतराव पवार, उमा अशोक पवार व आदेश अशोक पवार (रा. उघडेवाडी, ता. माळशिरस) यांनी विविध कंपन्यांच्या नावाखाली गुंतवणूकदारांना फसवले.


या आरोपींनी इन्फिनिटी बीकॉन फायनान्शिअल सर्विसेस, आय बी प्रो डेस्क आणि MASTERSYNERGY EDUTECH LLP या कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणुकीवर दरमहा १० टक्के परतावा मिळेल, तसेच काही महिन्यांत मूळ गुंतवणूक रक्कम दुप्पट होईल, असे खोटे आश्वासन दिले होते. आकर्षक परताव्याच्या आमिषामुळे अनेक नागरिकांनी या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवले.


फिर्यादी महिलेने आरोपींच्या विश्वासावर तब्बल २४ लाख ५० हजार रुपये गुंतवले, तर इतर १४ गुंतवणूकदारांकडूनही मोठ्या प्रमाणावर रक्कम स्वीकारण्यात आली. मात्र, ठरलेल्या कालावधीनंतर कोणताही मासिक परतावा देण्यात आला नाही. वारंवार मागणी करूनही आरोपींनी गुंतवणूकदारांना टाळाटाळ केली. अखेरीस संपर्क टाळणे, फोन बंद ठेवणे व कार्यालये बंद करणे असे प्रकार सुरू झाल्यानंतर गुंतवणूकदारांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.


तक्रारीनुसार, आरोपींनी कोणतीही अधिकृत परवानगी नसताना, तसेच आर्थिक संस्थांबाबतचे नियम डावलून नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक स्वीकारली. या प्रकरणात विश्वासघात, फसवणूक आणि संगनमताने गुन्हा केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ८२५/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३५१ (२), ३ (५) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिस तपासात आरोपींनी केवळ अकलूजच नव्हे, तर पुणे, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक नागरिकांकडून गुंतवणूक स्वीकारल्याचे निष्पन्न होत आहे. त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती कोट्यवधी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तपासादरम्यान आणखी गुंतवणूकदार पुढे येण्याची शक्यता असून, फसवणूक झालेल्या नागरिकांनी एकत्र येऊन तक्रारी नोंदवण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.


दरम्यान, पोलीस प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. “दरमहा निश्चित व जास्त परतावा देणाऱ्या योजनांकडे नागरिकांनी सावधगिरीने पाहावे. कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी तिची नोंदणी, परवानगी व कायदेशीर कागदपत्रांची खातरजमा करणे अत्यंत आवश्यक आहे,” असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच वरील कंपन्या किंवा अशा स्वरूपाच्या कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करून फसवणूक झालेली असल्यास संबंधित गुंतवणूकदारांनी तात्काळ गुंतवणुकीची सर्व कागदपत्रे घेऊन अकलूज पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक मितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निरज उबाळे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, तसेच पोलीस हवालदार अमोल बकाल व समीर पठाण करीत आहेत. आरोपींच्या आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेऊन बँक खाती गोठवणे, मालमत्ता जप्ती आणि इतर गुंतवणूकदारांची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


अकलूज व परिसरात घडलेला हा आर्थिक फसवणुकीचा प्रकार नागरिकांसाठी मोठा धडा ठरत असून, “सोप्या नफ्याच्या” आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments