मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
धनवाडी चौफुलीवर भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
चोपडा तालुक्यातील धनवाडी चौफुली परिसरात मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. बस व दुचाकी यांच्यात झालेल्या या धडकेत परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
मृत तरुणाचे नाव मंगल कृष्णनाथ साळुंखे (वय १८, रा. मांजरोद, ता. शिरपूर) असे असून गंभीर जखमी तरुण महेश अनिल पाटील (वय १९, रा. चांदसनी, ता. चोपडा) आहे. त्याच्यावर चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मंगळवार दिनांक १५ रोजी दुपारी सुमारे ३.२५ वाजताच्या सुमारास धनवाडी चौफुली येथे हा अपघात झाला. अडावदकडून चोपड्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या बसने चौफुलीवरून जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की दुचाकीवरील मंगल साळुंखे हे रस्त्यावर फेकले जाऊन जागीच ठार झाले, तर महेश पाटील गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी महेश पाटील यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात संबंधित बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. धनवाडी चौफुलीवर यापूर्वीही अपघात घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या चौफुलीवर वेग मर्यादा, गतिरोधक व वाहतूक नियंत्रणाची आवश्यकता असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
या अपघातामुळे साळुंखे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment
0 Comments