मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
चाळीसगाव
चाळीसगाव नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची एक महत्त्वपूर्ण बैठक येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने तसेच नागरिकांच्या मूलभूत समस्या प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि सोडविण्यासाठी एक अभिनव संकल्पना मांडण्यात आली. प्रति नगरसेवक ही ही अभिनव कल्पना दिलीप घोरपडे यांनी बैठकीत मांडली असून, त्यांच्या या संकल्पनेला उपस्थित सर्व पराभूत उमेदवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकमताने प्रचंड प्रतिसाद दिला.
या बैठकीत बोलताना दिलीप घोरपडे म्हणाले की, “जरी आम्ही निवडणुकीत पराभूत झालो असलो तरी आमच्यावर जनतेने टाकलेली मते ही अल्प नाहीत. त्या मतांमागे नागरिकांचा विश्वास आणि अपेक्षा दडलेल्या आहेत. त्यामुळे निवडणूक हरलो म्हणून समाजाप्रतीची जबाबदारी संपत नाही, तर ती अधिक वाढते.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, ज्या प्रभागातून आम्ही निवडणूक लढवली आहे त्या प्रभागातील नागरिकांच्या नागरी समस्या, विकासकामे, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, प्रकाश व्यवस्था आदी बाबींसाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत.
या पार्श्वभूमीवर चाळीसगाव नगरपरिषदेच्या एकूण १८ प्रभागांमध्ये प्रति नगरसेवक नियुक्त करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. हे प्रति नगरसेवक अधिकृत नगरसेवक नसले तरी ते आपल्या-आपल्या प्रभागातील नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून काम करणार असून, नागरिकांच्या समस्या नगरपरिषद प्रशासनापर्यंत पोहोचविणे, त्यांचा पाठपुरावा करणे व प्रशासनावर योग्य तो दबाव टाकून कामे करून घेणे ही त्यांची मुख्य जबाबदारी असणार आहे.
बैठकीत नगरपरिषद प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव व सखोल अभ्यास असलेले माजी नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “नगरपरिषद प्रशासनाशी समन्वय साधून काम कसे करून घ्यायचे, कोणत्या विषयांसाठी कोणत्या विभागाशी संपर्क साधायचा, तसेच शासकीय नियम व कार्यपद्धती कशा असतात, याची माहिती असणे आवश्यक आहे. योग्य पद्धतीने पाठपुरावा केल्यास नागरिकांची अनेक प्रलंबित कामे मार्गी लावता येऊ शकतात.”
घृष्णेश्वर पाटील यांनी प्रति नगरसेवकांना प्रशासनाशी संघर्ष न करता समन्वयाची भूमिका ठेवण्याचा सल्ला दिला. तसेच नागरिकांच्या समस्या लेखी स्वरूपात नोंदवून त्यावर नियमित पाठपुरावा करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. यामुळे नगरपरिषद प्रशासनालाही जबाबदारीने काम करावे लागेल, असे त्यांनी नमूद केले.
या बैठकीत उपस्थित उमेदवारांनी आपल्या-आपल्या प्रभागांतील समस्या मांडल्या. अनेक प्रभागांमध्ये कचरा संकलनाची अडचण, स्वच्छतेचा अभाव, सांडपाणी व्यवस्थेतील त्रुटी, पिण्याच्या पाण्याची टंचाई, रस्त्यांची दुरवस्था, पथदिव्यांचे बंद असणे, मोकाट जनावरांचा त्रास, आरोग्यविषयक प्रश्न अशा विविध समस्यांचा उल्लेख करण्यात आला. या सर्व समस्यांवर एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
बैठकीच्या शेवटी लवकरच प्रत्येक प्रभागासाठी प्रति नगरसेवक जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. हे प्रति नगरसेवक नागरिकांशी थेट संपर्क ठेवून त्यांच्या समस्या ऐकून घेतील, त्यावर उपाययोजना सुचवतील आणि आवश्यक तेथे नगरपरिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करतील. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करून शासकीय योजना, स्वच्छता अभियान, कर भरणा, पाणी बचत आदी विषयांवर मार्गदर्शन करण्याचाही त्यांचा मानस आहे.
या बैठकीला महेंद्र पाटील, माजी नगरसेवक चंद्रकांत तायडे, संजय पितांबर चौधरी, भुषण ब्राह्मणकार, अमोल नानकर, नितीन देशमुख, आनंदा पवार, दुर्गेश जाधव, प्रशांत पाटील, सचिन आव्हाड, योगेश राजधर पाटील, सागर मधुकर पाटील, सौरभ पाटील, गोपाल भालेराव, बबन पवार, लवेश राजपुत, चिरागोद्यीन शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
या अभिनव उपक्रमामुळे चाळीसगाव शहरातील नागरिकांना थेट त्यांच्या प्रभागात एक जबाबदार प्रतिनिधी उपलब्ध होणार असून, नगरपरिषदेच्या कामकाजावर सकारात्मक दबाव निर्माण होईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. निवडणुकीनंतरही जनतेशी नाते न तोडता समाजसेवेचा वसा जपण्याचा हा प्रयत्न शहराच्या विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

Post a Comment
0 Comments