Type Here to Get Search Results !

धुळ्यातील गुरुद्वारातील संघर्ष प्रकरण गंभीर वळणावर

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283



आरोपी रणबीरसिंग खालसाच्या निवासस्थानातून ४३ जिवंत काडतुसे जप्त


दोन मॅगझीनही आढळल्याने खळबळ, आरोपीच्या अडचणीत मोठी वाढ


धुळे 


धुळ्यातील गुरुद्वारामध्ये संत श्री धीरजसिंहजी यांच्या हत्येनंतर दोन गटांमध्ये निर्माण झालेला तणाव आता अधिकच गंभीर वळणावर पोहोचला आहे. गुरुगोविंदसिंग जयंतीच्या कार्यक्रमास विरोध व गुरुद्वाराचे गेट बंद केल्याच्या कारणातून दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारी प्रकरणात आता मोठा धक्कादायक खुलासा झाला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी रणबीरसिंग सुखदेवसिंग खालसा याच्या गुरुद्वारातील निवासस्थानातून पोलिसांनी तब्बल ४३ जिवंत काडतुसे आणि दोन मॅगझीन जप्त केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.


आठवडाभरापूर्वी उसळला होता हिंसाचार


धुळ्यातील गुरुद्वाराचे प्रमुख संत श्री धीरजसिंहजी यांच्या हत्येनंतर गुरुद्वाराशी संबंधित दोन गटांमधील सुप्त संघर्ष पुन्हा उफाळून आला होता. त्यातच गुरुद्वाराचे मुख्य गेट बंद करण्यात आल्याने तसेच ५ तारखेला साजऱ्या होणाऱ्या गुरुगोविंदसिंग जयंतीच्या कार्यक्रमास एका गटाने विरोध केल्याने वाद अधिक चिघळला. या वादाचे रूपांतर थेट हिंसक संघर्षात झाले.


रविवार, दिनांक ४ रोजी दुपारी दोन्ही गट आमनेसामने आले. यावेळी लाठ्या-काठ्या, लोखंडी रॉड, तलवारी यांचा सर्रास वापर करण्यात आला. काही ठिकाणी दगडफेकही झाली. या हाणामारीत अनेक जण जखमी झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


फायर एक्सटिंगूशर गॅसचा वापर, गंभीर मारहाण


सत्येंद्रपाल लाडद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित रणबीरसिंग खालसा यांच्या सांगण्यावरून फिर्यादी व साक्षीदारांच्या अंगावर फायर एक्सटिंगूशरमधील गॅस सोडण्यात आला. त्यानंतर दगडफेक करत लोखंडी रॉड, तलवारी व लाठ्या-काठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात काही जणांना गंभीर दुखापती झाल्या असून एक जखमी सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.


अनेक आरोपींविरोधात गुन्हे दाखल


या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये

रणबीरसिंग खालसा, जगबीरसिंग हरप्रीतसिंग संधू, शाविंदरसिंग राजवंतसिंग, गुरप्रीतसिंग बसंतसिंग, संदीपसिंग भवरलाल, गुरिंदरसिंग लखबीरसिंग (जखमी), दर्शनसिंग सुखदेवसिंग खालसा, दलरसिंग अमीरसिंग, लालसिंग सिंगरसिंग, सुदेशसिंग बच्चनलाल, दारासिंग मखनसिंग, करतारसिंग जगरसिंग यांच्यासह इतरांचा समावेश आहे. यापैकी काही आरोपींना पोलिसांनी अटकही केली आहे.


आरोपीच्या घरातून शस्त्रसाठा सापडल्याने खळबळ


अटकेत असलेल्या रणबीरसिंग खालसा याच्या गुरुद्वारातील निवासस्थानाची पोलिसांनी झडती घेतली असता, त्याठिकाणी एसएलआर रायफलसाठी वापरल्या जाणाऱ्या ८ एमएमच्या ८ काडतुसे तसेच पिस्टलसाठी लागणाऱ्या ४५ एमएमच्या तब्बल ३५ काडतुसे आढळून आली. यासोबतच दोन मॅगझीनही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसे सापडल्याने आरोपीच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.


नव्याने अटक व हद्दपारीचा प्रस्ताव


रणबीरसिंग खालसा सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याने या नव्याने उघड झालेल्या शस्त्रसाठा प्रकरणात त्याला पुन्हा नव्याने अटक केली जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. तसेच आरोपीला धुळे जिल्ह्यातून हद्दपार करण्यासंदर्भात प्रांताधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.


शहरात तणाव, पोलिसांचा कडक बंदोबस्त


या संपूर्ण प्रकरणामुळे धुळ्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी गुरुद्वार परिसरात तसेच संवेदनशील भागात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात असली तरी पोलीस प्रशासनाकडून सतत नजर ठेवण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments