Type Here to Get Search Results !

वरणगावात नायलॉन मांजाविरोधात पोलिसांचा जोरदार धडाका

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283


तळवेल येथे अवैध विक्रीवर कारवाई, ५३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त


नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी पोलिसांची कठोर भूमिका


वरणगाव 

वरणगाव तालुका भुसावळ येथील तळवेल गावात नायलॉन मांजाची अवैध विक्री व साठवणूक करणाऱ्यांविरोधात वरणगाव पोलिसांनी जोरदार कारवाई करत एकाला ताब्यात घेतले आहे. नायलॉन मांजामुळे नागरिक, दुचाकीस्वार तसेच पक्षी व पशुधन यांना होणाऱ्या गंभीर दुखापतींच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याने पोलिसांच्या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे.


दि. ९ रोजी (शुक्रवार) वरणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशानुसार स्थागुचा पथकाने ही विशेष मोहीम राबवली. तळवेल परिसरात बेकायदेशीररित्या नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचून अचानक छापा टाकला.


या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सौपान गोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रेमचंद सपकाळे, विनोद पाटील, सलीम तडवी, श्रीकृष्ण देशमुख, रविंद्र चौधरी, छगन तायडे व रतन गिते या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. छाप्यादरम्यान आरोपी रविंद्र पुरुषोत्तम बोंडे (वय ५५, रा. तळवेल) याच्याकडून अंदाजे ५,००० रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे बंडल व ३०० रुपये किमतीची रिकामी चक्री असा एकूण ५,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


नायलॉन मांजामुळे अनेक वेळा दुचाकीस्वारांच्या गळ्याला गंभीर जखमा होण्याचे, तसेच पक्षी मृत्युमुखी पडण्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे शासनाने नायलॉन मांजावर संपूर्ण बंदी घातली असतानाही काही विक्रेते नियम डावलून हा जीवघेणा मांज विकत असल्याचे दिसून येत आहे.


अशा समाजघातक प्रकारांविरोधात पोलिस प्रशासन कठोर भूमिका घेत असून भविष्यातही नायलॉन मांजाविरोधात कारवाया अधिक तीव्र केल्या जातील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर व विक्री टाळावी तसेच अशा प्रकारांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments