मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
जळगाव–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या जकात नाक्याजवळील स्टेट बँकेच्या एटीएमवर आंतरराज्यीय चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा धाडसी प्रयत्न केल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. मात्र गॅस कटरमधून निर्माण झालेल्या तीव्र उष्णतेमुळे एटीएममधील नोटांना अचानक आग लागल्याने चोरट्यांचा डाव फसला आणि त्यांनी घाईघाईत घटनास्थळावरून पलायन केले. या आगीत एटीएममधील लाखो रुपयांची रोकड जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
एमआयडीसी हद्दीत असलेल्या या एटीएमवर सुरक्षा व्यवस्था अत्यंत तोकडी असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. पहाटेच्या वेळेत परिसरात वर्दळ नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी चारचाकी वाहनातून येत एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. एटीएममध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम मशीनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून ते निष्क्रिय करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन कापण्यास सुरुवात केली.
मात्र मशीन कापताना निर्माण झालेल्या उष्णतेमुळे एटीएमच्या आत असलेल्या नोटांनी अचानक पेट घेतला. काही क्षणातच एटीएममध्ये मोठ्या प्रमाणावर धूर पसरला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच चोरटे घाबरले आणि कोणतीही रोकड न घेता घटनास्थळावरून पळ काढला. काही वेळातच एटीएममधून धूर आणि आगीची ज्वाळा दिसू लागल्याने परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आगीमुळे एटीएमचे मोठे नुकसान झाले असून आत ठेवलेली रोकड पूर्णपणे जळाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, एटीएम फोडण्याचा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. फुटेजमध्ये चार संशयित चोरटे चारचाकी वाहनातून येताना व एटीएम फोडण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. ही टोळी आंतरराज्यीय असण्याचा पोलिसांना संशय असून, त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत असून लवकरच या प्रकरणाचा छडा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment
0 Comments