मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
पारोळा–धुळे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका तरुण विवाहितेचा जागीच मृत्यू झाला असून तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. हा दुर्दैवी अपघात मळगाव शिवारातील जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 आणि नवीन चौपदरी महामार्ग क्रमांक 53 यांना जोडणाऱ्या बायपास रस्त्यावर शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या अपघातात मयत झालेल्या विवाहितेचे नाव रूपाली शुभम बोरसे (वय 21) असून त्या उंदिरखेडे (ता. पारोळा) येथील रहिवासी होत्या. त्यांचे पती शुभम भाऊसाहेब बोरसे (वय 25) हे गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शुभम बोरसे हे पत्नी रूपाली यांच्यासोबत दुचाकी (एम.एच. 19 सी.के. 6252) ने उंदिरखेडे येथून जळगावकडे जात होते. मळगाव शिवारात बायपास जोडणीच्या ठिकाणी ते रस्ता ओलांडत असताना एरंडोलकडून धुळ्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने (एच.आर. 58 ए.एफ. 1313) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडकेचा जोर इतका प्रचंड होता की दुचाकीवरून रूपाली बोरसे खाली फेकल्या गेल्या. गंभीर जखमा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात पती शुभम बोरसे हेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, या बायपास रस्त्यावर यापूर्वीही अपघात झाले असून वेगमर्यादा आणि वाहतूक नियंत्रणाबाबत प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment
0 Comments