मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
चाळीसगाव :
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात तब्बल सहा वर्षांपूर्वी बंद पडलेला के.बी.एस. साखर कारखाना होळकर कुटुंबीयांनी पुन्हा सुरू केल्याने तेथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव तालुक्यातील दीर्घकाळापासून बंद असलेला बेलगंगा साखर कारखाना अद्याप सुरू का होत नाही, असा सवाल उपस्थित होत असून, हा कारखाना तातडीने सुरू करावा, अशी जोरदार मागणी शेतकरी, कामगार आणि नागरिकांकडून होत आहे.
बेलगंगा साखर कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून पूर्णतः बंद अवस्थेत असून, कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपला ऊस परजिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे पाठवावा लागत आहे. दररोज उसाने भरलेली वाहने चाळीसगाव परिसरातून बाहेर जाताना दिसून येत असून, त्यामुळे वाहतूक खर्चात मोठी वाढ होत आहे. परिणामी शेतकऱ्यांचा नफा घटत असून त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. वेळेत ऊस न गेल्यास उत्पादनाची गुणवत्ता कमी होत असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे.
आजच्या बदलत्या परिस्थितीत केवळ साखर उत्पादनावर अवलंबून राहून कारखाना चालवणे अवघड झाले आहे. इथेनॉल निर्मिती, वीज निर्मिती, बायो-सीएनजी यांसारख्या उपपदार्थ प्रकल्पांशिवाय साखर कारखान्यांचे अस्तित्व टिकवणे कठीण बनले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने या आधुनिक व्यवस्थापन पद्धती स्वीकारून यशस्वीरीत्या चालू आहेत. मात्र चाळीसगाव तालुक्यातील बेलगंगा साखर कारखाना या संधींपासून वंचित राहिला आहे.
जळगाव जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने सध्या अडचणीत सापडलेले असून काही कारखाने पूर्णतः बंद अवस्थेत आहेत. चाळीसगाव तालुक्यात सुमारे २५०० हेक्टर ऊस क्षेत्र उपलब्ध असतानाही स्थानिक साखर कारखाना बंद असणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. कधी काळी सहकार तत्त्वावर चालणारा बेलगंगा साखर कारखाना नावाजलेला होता. कारखाना सुरू असताना तालुक्याच्या आर्थिक घडामोडींना चालना मिळाली होती, हजारो कामगारांना थेट व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला होता.
मात्र राजकीय कुरघोडी, सत्तासंघर्ष, आर्थिक गैरव्यवस्थापन आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे हा कारखाना हळूहळू अडचणीत आला आणि अखेर बंद पडला. अनेक राजकारण्यांनी आपल्या स्वार्थासाठी कारखान्याचा वापर केला, मात्र तो सुरू ठेवण्यासाठी किंवा पुनरुज्जीवनासाठी कुणीही ठोस आणि दीर्घकालीन प्रयत्न केले नाहीत, असा आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे.
कारखाना बंद पडल्यामुळे हजारो कामगार बेरोजगार झाले असून, उसतोड मजूर परजिल्ह्यात स्थलांतरित झाले आहेत. बेलगंगा कारखाना विक्री होऊन चांगले दिवस येतील, या अपेक्षाही फोल ठरल्या आहेत. आज बंद अवस्थेत असलेल्या कारखान्याच्या परिसरातून जेव्हा उसाच्या गाड्या धुराळ उडवत बाहेर जातात, तेव्हा बेलगंगेचे एकेकाळचे वैभव डोळ्यांसमोर तरळून जाते, अशी भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
जर बेलगंगा साखर कारखाना पुन्हा सुरू झाला आणि पश्चिम महाराष्ट्रातील यशस्वी साखर कारखान्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आधुनिक व्यवस्थापन, उपपदार्थ प्रकल्प, पारदर्शक कारभार आणि मजबूत राजकीय इच्छाशक्ती दाखवली गेली, तर चाळीसगाव तालुक्याचा सर्वांगीण विकास निश्चितच साध्य होऊ शकतो. आज बेलगंगा बंद असल्यामुळे शेतकरी परजिल्ह्यातील कारखान्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ एका कारखान्याचा नसून, शेतकरी, कामगार आणि संपूर्ण तालुक्याच्या आर्थिक भवितव्याशी निगडित आहे.
निफाड तालुक्यातील साखर कारखाना पुन्हा सुरू होऊ शकतो, तर चाळीसगाव तालुक्यातील बेलगंगा साखर कारखाना का सुरू होऊ शकत नाही? हा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतून तीव्रपणे उपस्थित केला जात आहे.

Post a Comment
0 Comments