मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
चाळीसगाव :
चाळीसगाव तालुक्यातील वडाळा गावात देशाच्या सीमेवर सेवा बजावणाऱ्या बीएसएफ जवानावर व त्यांच्या कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात असून सदर हल्ल्याचा सर्व स्तरांतून तीव्र निषेध करण्यात येत आहे. विशेषतः आजी-माजी सैनिक संघटनांनी या घटनेची गंभीर दखल घेत दोषींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.
वडाळा येथील बीएसएफ जवान मुकेश तुळशीराम सूर्यवंशी हे सध्या सुट्टीवर गावी आले असताना, ७ जानेवारी रोजी शेतरस्त्याच्या वादातून त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी अचानक केलेल्या या हल्ल्यात जवानासह कुटुंबीय जखमी झाले असून, या घटनेने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या प्रकरणात दोषींविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत कठोर कारवाई करावी, तसेच संपूर्ण घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करावी, अशी ठाम मागणी आजी व माजी सैनिकांनी केली आहे. देशाच्या सुरक्षेसाठी प्राण पणाला लावणाऱ्या जवानांवरच गावात हल्ले होत असतील, तर ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास माजी सैनिक व त्यांच्या नातेवाईकांसह आमरण उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन संबंधित प्रशासनाला देण्यात आले असून, या निवेदनाच्या प्रती महसूल मंत्री व जिल्हाधिकारी यांनाही सादर करण्यात आल्या आहेत.
या घटनेमुळे वडाळा परिसरात तणावाचे वातावरण असून, दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतूनही होत आहे.

Post a Comment
0 Comments