मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
पाचोरा प्रतिनिधी :
बहीरमनगर, पाचोरा येथील प्रसिद्ध श्री भैरवनाथ मंदिरात पापमोचनी एकादशीच्या औचित्याने धार्मिक परंपरेला साजेसा उपक्रम राबविण्यात आला. रविवार, दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी पापमोचनी एकादशीचा योग आल्याने भाविकांसाठी उपवासाला योग्य असलेल्या साबुदाणा खिचडीचा फराळ ठेवण्यात आला.
हिंदू धर्मपरंपरेनुसार एकादशीच्या दिवशी भात व अन्नधान्याचे सेवन वर्ज्य मानले जाते. या धार्मिक संकेतांचा आदर राखत बहीरमनगर येथील भैरवनाथ मित्र मंडळातर्फे भाविकांच्या श्रद्धेला अनुसरून प्रसादात बदल करून साबुदाणा खिचडीचे आयोजन करण्यात आले. सकाळपासून मंदिर परिसरात भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. अनेक भाविकांनी श्री भैरवनाथांचे दर्शन घेत भक्तिभावाने फराळाचा लाभ घेतला.
या प्रसंगी पाचोरा तहसीलदार मा. श्री विजयजी बनसोडे साहेब यांनी भैरवनाथ मंदिरात येऊन श्री भैरवनाथांचे दर्शन घेतले तसेच भाविकांसोबत साबुदाण्याच्या फराळाचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित भैरवनाथ मित्र परिवाराशी मनमोकळा संवाद साधताना सांगितले की, “मी येथे साधा माणूस म्हणून आलो आहे. मी तहसीलदारच्या खुर्चीवर बसलो तेव्हाच तहसीलदार असतो; पण येथे मी सर्वसामान्य माणूस आहे. जातभेद मी मानत नाही, माणुसकी हाच खरा धर्म आहे.” त्यांच्या या विचारांचे उपस्थित भाविकांनी स्वागत केले.
साहेबांनी आपला अमूल्य वेळ देऊन कार्यक्रमास उपस्थित राहून मंडळाचा उत्साह वाढविला, याबद्दल भैरवनाथ मित्र मंडळातर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, दर रविवारी मंदिरात भक्तांसाठी प्रसादाचे वाटप केले जाते आणि समाजात धार्मिक परंपरा जपत भक्तांमध्ये ऐक्य व भक्तिभाव वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.
पापमोचनी एकादशीच्या निमित्ताने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. भविष्यातही रविवारी एकादशीचा योग आल्यास भक्तांसाठी साबुदाणा खिचडीचा प्रसाद देण्यात येईल, अशी माहिती भैरवनाथ मित्र मंडळाच्या वतीने देण्यात आली.
भैरवनाथ मित्र मंडळ, पाचोरा यांनी सांगितले की तहसीलदार विजयजी बनसोडे यांची ही भेट मंडळासाठी एक अनमोल क्षण ठरला.


Post a Comment
0 Comments