Type Here to Get Search Results !

युद्धाचा इंधन बाजारावर परिणाम; गॅस सिलेंडर बुकिंगसाठी २५ दिवसांची नवी अट, दरवाढीचा दुहेरी फटका

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283



मध्य-पूर्वेतील युद्धाचा परिणाम! गॅस सिलेंडर बुकिंगसाठी आता २५ दिवसांची अट; दरवाढीने सर्वसामान्यांवर दुहेरी फटका


मध्य-पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता जगभर जाणवू लागला आहे. तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठा साखळीवर त्याचा मोठा परिणाम झाला असून अनेक देशांमध्ये इंधनाच्या उपलब्धतेबाबत चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंगसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.


पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगचा कालावधी २१ दिवसांवरून वाढवून २५ दिवस करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्लॅक मार्केटिंग आणि साठेबाजी (हॉर्डिंग) रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की सध्या देशात घरगुती गॅस, डिझेल किंवा पेट्रोलचा कोणताही तुटवडा नाही. मात्र काही ठिकाणी साठेबाजी होऊ नये आणि पुरवठा सुरळीत राहावा यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.


विशेष म्हणजे अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पेट्रोलियम मंत्रालयाने एलपीजी सिलेंडर बुकिंगचा कालावधी १५ दिवसांवरून २१ दिवस केला होता. आता तो आणखी वाढवून २५ दिवस करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना दोन सिलेंडर बुकिंगदरम्यान किमान २४ दिवसांचे अंतर ठेवावे लागणार आहे. म्हणजेच या कालावधीपूर्वी दुसरा सिलेंडर बुक करता येणार नाही.


दरम्यान, पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीतही वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत ६० रुपयांची वाढ झाली असून कमर्शियल सिलेंडरच्या किंमतीत ११४.५० रुपयांची वाढ झाली आहे. हे नवीन दर ७ मार्चपासून लागू झाले आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या माहितीनुसार मुंबईमध्ये नॉन-सब्सिडी घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत आता ९१२.५० रुपयांवर पोहोचली आहे.


यामुळे एकीकडे सिलेंडर बुकिंगसाठी वाढलेला कालावधी आणि दुसरीकडे दरवाढ यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर दुहेरी आर्थिक ताण पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारने साठेबाजी रोखण्यासाठी हा निर्णय घेतला असला तरी त्याचा थेट परिणाम सामान्य कुटुंबांवर होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Post a Comment

0 Comments