मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
एरंडोलमध्ये नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना : मामाकडून चार वर्षांच्या भाचीवर अत्याचार; संतप्त नातेवाईकांचा महामार्ग ५३ वर रास्ता रोको
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल शहरातून नातेसंबंधांना काळीमा फासणारी संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःच्या चार वर्षीय भाचीवर अत्याचार केल्याप्रकरणी मामाला एरंडोल पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल शहरातील एका परिसरात चार वर्षांची चिमुकली आपल्या आई-वडिलांसोबत वास्तव्यास आहे. त्यांच्या घराशेजारीच तिचा मामा देखील राहतो. मंगळवारी दुपारच्या सुमारास चिमुकली घरात एकटी असल्याचे पाहून संशयित मामाने तिला स्वतःच्या घरी नेले. तेथे तिच्याशी घृणास्पद कृत्य करत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.
काही वेळानंतर मुलीची आई घरी परतल्यानंतर तिला मुलगी घरात दिसून आली नाही. त्यामुळे आईने आजूबाजूच्या घरांमध्ये शोध घेतला असता चिमुकली मामाच्या घरात आढळून आली. यानंतर संतप्त आई-वडिलांनी तात्काळ एरंडोल पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित मामाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पवार करत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली. संतप्त नातेवाईकांनी “आरोपीला आमच्या ताब्यात द्या” अशी मागणी करत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर सुमारे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अखेर डीवायएसपी विनायक कोते यांनी आरोपीवर कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Post a Comment
0 Comments