मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
नाशिक | प्रतिनिधी
नाशिक शहरात धारदार शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने सुरू केलेल्या विशेष मोहिमेला चांगले यश मिळत असून, सातपूर परिसरातून धारदार लोखंडी कोयत्यासह फिरणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून सुमारे ५०० रुपये किमतीचा लोखंडी धारदार कोयता जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच प्राणघातक शस्त्रे बाळगून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना दिले आहेत. त्यानुसार शहरातील विविध भागांत विशेष शोधमोहीम आणि प्रतिबंधात्मक गस्त सुरू आहे.
या मोहिमेअंतर्गत २ जुलै रोजी गुन्हे शाखा युनिट-२ चे पथक परिमंडळ क्रमांक २ च्या हद्दीत प्रतिबंधात्मक गस्त घालत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर आणि पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांना गुप्त माहिती मिळाली. सातपूर परिसरातील हॉटेल जलसा परिसरात एक तरुण धारदार लोखंडी कोयता घेऊन संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळताच ही बाब तात्काळ प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
माहितीची खातरजमा करून हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने बोरा ट्रान्सपोर्ट कंपनीसमोर, नगर मार्गावर सापळा रचला. काही वेळात संशयास्पद हालचाली करणारा एक तरुण तेथे आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव ललित हरीष बल्लक (वय १९, रा. फुलेनगर, पंचवटी, नाशिक) असे सांगितले.
यानंतर पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेण्यात आली असता त्याच्याकडे एक धारदार लोखंडी कोयता आढळून आला. संबंधित तरुणाकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना अथवा कायदेशीर कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तो कोयता जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या शस्त्राची अंदाजे किंमत ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला तसेच जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून, त्याच्याकडून हे शस्त्र कुठून आणण्यात आले, त्याचा वापर कोणत्या उद्देशाने केला जाणार होता आणि त्याचा इतर गुन्हेगारी घटनांशी काही संबंध आहे का, याबाबत सखोल तपास सुरू आहे.
नाशिक शहरात अवैध शस्त्रधारक, सराईत गुन्हेगार आणि दहशत माजविणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेमुळे गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण होत असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना बळकट होत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
ही यशस्वी कारवाई प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी आणि बाल्मिक चव्हाण यांनी संयुक्तपणे पार पाडली. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढील काळातही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment
0 Comments