मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या वीज समस्यांवर अखेर जोरदार आवाज उठविण्यात आला. दि. १३ जुलै २०२६ रोजी पाचोरा येथील व्यापारी भवन येथे कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महावितरण विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मतदारसंघातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, शेतीपंपांना अपुरा वीजपुरवठा, जळालेले रोहित्र, कमी दाबाची वीज, नवीन वीजजोडणीतील विलंब आणि धोकादायक वीजवाहिन्यांचे प्रश्न यावर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीत नगरदेवळा–बाळद जिल्हा परिषद गटातील नागरिकांच्या समस्या सर्वाधिक प्रभावीपणे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब (जिभू) पाटील यांनी मांडल्या. अनेक गावांतील शेतकरी व नागरिकांना प्रत्यक्ष भेडसावणाऱ्या अडचणींचा त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने उल्लेख करत महावितरणच्या अधिकाऱ्यांना ठोस प्रश्न विचारले. केवळ कागदोपत्री अहवाल न मांडता प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेऊन काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
रावसाहेब (जिभू) पाटील यांनी वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे होत असलेले नुकसान, पिण्याच्या पाण्याच्या योजनांवर होणारा परिणाम, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन अडचणींचा उल्लेख केला. जळालेले रोहित्र बदलण्यासाठी होणारा विलंब, कमी दाबामुळे शेतीपंप व्यवस्थित सुरू न होणे, नवीन वीजजोडणीसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयाचे फेरे मारावे लागणे तसेच लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्यांमुळे निर्माण होणारा जीविताचा धोका या सर्व बाबींवर त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज यंत्रणेची तातडीने दुरुस्ती करणे, धोकादायक वीजवाहिन्या सुरक्षित करणे, जळालेले रोहित्र त्वरित बदलणे आणि प्रत्येक तक्रारीचे निश्चित कालमर्यादेत निराकरण करण्याची मागणी त्यांनी ठाम शब्दांत केली. नागरिकांना वारंवार कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, तर त्यांच्या गावातच त्यांच्या समस्या मार्गी लागल्या पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.
यावेळी आमदार किशोरआप्पा पाटील यांनीही बैठकीत उपस्थित महावितरण अधिकाऱ्यांना नागरिकांच्या तक्रारी अत्यंत गांभीर्याने घेण्याच्या सूचना दिल्या. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, प्रत्येक गावातील वीज समस्या निश्चित कालमर्यादेत सोडवाव्यात आणि कोणत्याही गावावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. प्रलंबित कामांचा नियमित आढावा घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीत उपस्थित महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध तक्रारींची नोंद घेत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. लवकरच तांत्रिक अडचणी दूर करून नागरिकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. या बैठकीमुळे नगरदेवळा–बाळद जिल्हा परिषद गटासह संपूर्ण पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांमध्ये त्यांच्या प्रलंबित वीज समस्या लवकरच मार्गी लागतील, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.
रावसाहेब (जिभू) पाटील यांनी या बैठकीत घेतलेली ठाम भूमिका विशेष चर्चेचा विषय ठरली. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारा नेता म्हणून त्यांनी पुन्हा एकदा आपली ओळख अधोरेखित केली. कोणत्याही प्रकारचा दिखावा न करता सामान्य माणसाच्या अडचणी स्वतःच्या समजून प्रशासनासमोर प्रभावीपणे मांडण्याची त्यांची कार्यशैली नागरिकांच्या विश्वासाला अधिक बळ देणारी ठरली. शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबांच्या समस्या सोडवण्यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करतात, याची प्रचिती या बैठकीतही आली.
गेल्या अनेक वर्षांपासून लोकहिताचे प्रश्न असोत, विकासकामे असोत किंवा प्रशासनातील दिरंगाईविरोधातील लढा असो, रावसाहेब (जिभू) पाटील यांनी नेहमीच आक्रमक आणि लोकाभिमुख भूमिका घेतली आहे. जनतेच्या हक्कासाठी अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचे धाडस आणि प्रश्न सुटेपर्यंत पाठपुरावा करण्याची त्यांची कार्यपद्धती त्यांना सर्वसामान्यांमध्ये वेगळी ओळख मिळवून देते. त्यामुळेच ग्रामीण भागातील नागरिक त्यांच्याकडे विश्वासाने पाहतात.
या बैठकीत त्यांनी मांडलेले प्रत्येक मुद्दे हे प्रत्यक्ष जनतेच्या वेदनेशी निगडित असल्याचे स्पष्टपणे जाणवले. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे महावितरण अधिकाऱ्यांनाही समस्यांची तीव्रता मान्य करावी लागली. शेतकऱ्यांना न्याय मिळावा, गावागावात सुरळीत वीजपुरवठा व्हावा आणि प्रत्येक नागरिकाला दर्जेदार सेवा मिळावी, यासाठी त्यांनी दाखविलेली तळमळ उपस्थितांच्या मनात ठसा उमटवून गेली. लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ आश्वासने देणारा नव्हे, तर संकटाच्या वेळी जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा नेतृत्वगुण असलेला व्यक्ती असतो, याचे प्रत्यंतर रावसाहेब (जिभू) पाटील यांच्या भूमिकेतून पुन्हा एकदा दिसून आले.




Post a Comment
0 Comments