मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
चोपडा तालुक्यातील वढोदा गावालगत असलेल्या अनेर नदीपात्रातून विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर चोपडा ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे ४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलै रोजी सकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास वढोदा गावालगतच्या अनेर नदीपात्रात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता दीपक आत्माराम भिल (वय २६, रा. वढोदा, ता. चोपडा) हा कोणतीही शासकीय परवानगी नसताना ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये एक ब्रास वाळू भरून वाहतूक करत असल्याचे आढळून आले.
यावेळी पोलिसांनी संबंधित ट्रॅक्टर-ट्रॉली ताब्यात घेतली. कारवाईदरम्यान सुमारे ४ लाख रुपये किमतीचा स्वराज ७४४ एफई ट्रॅक्टर (क्र. एमएच-२७ एल-५०८८), ट्रॉली तसेच अंदाजे ५ हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू असा एकूण ४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मनेश वसंत गावीत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत कोळी करीत आहेत.
दरम्यान, नदीपात्रातून होणारा अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांसह महसूल प्रशासनाकडून कारवाईची मोहीम सुरू असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Post a Comment
0 Comments