Type Here to Get Search Results !

चाळीसगावात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; २९ अन्ननमुने तपासणीसाठी, सुमारे १२ लाखांचा संशयित साठा जप्त

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283



राज्यात अन्नभेसळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या धडक कारवाईचे पडसाद आता चाळीसगावातही उमटू लागले आहेत. सामाजिक कार्यकर्ते रामलाल चौधरी यांनी केलेल्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरात व्यापक तपासणी मोहीम राबवून अन्नभेसळ करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे भेसळखोरांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांकडून या मोहिमेचे स्वागत केले जात आहे.


अन्न व औषध प्रशासनाने चाळीसगाव शहर व परिसरातील विविध आस्थापनांची तपासणी करून दूध, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, बेकरी उत्पादने, फराळाचे पदार्थ तसेच इतर अन्नपदार्थांचे एकूण २९ नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. यामध्ये दुधाचे ७, दुग्धजन्य पदार्थांचे ७, खाद्यतेलाचे ३, बेकरी पदार्थांचे ३, फराळाचे २ आणि इतर अन्नपदार्थांचे ७ नमुने समाविष्ट आहेत. हे सर्व नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.


तपासणीदरम्यान सुमारे ११ लाख ६८ हजार रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त करण्यात आला. याशिवाय नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ५२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. प्रशासनाने १५ हॉटेल्सची तपासणी, ६ सुधारणा नोटिसा आणि ५ प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालात अन्नभेसळ सिद्ध झाल्यास संबंधितांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून दोषींची नावे अधिकृतपणे जाहीर केली जाणार आहेत.


दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते रामलाल चौधरी यांनी अन्नभेसळविरोधातील कारवाई सातत्याने सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. कारवाईत कोणतीही शिथिलता आल्यास मुंबई व नाशिक येथील अन्न व औषध प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पुन्हा तक्रार करून पाठपुरावा करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.


दुधाचे आगार म्हणून ओळख असलेल्या चाळीसगाव शहर व तालुक्यात स्थानिक उत्पादनापेक्षा अधिक प्रमाणात दूध बाजारात उपलब्ध होत असल्याने हे अतिरिक्त दूध नेमके कुठून येते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संपूर्ण पुरवठा साखळीची सखोल चौकशी करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे. काही संशयित भेसळखोर प्रशासनाच्या रडारवर असून त्यांच्याविरोधात टप्प्याटप्प्याने पुराव्यानिशी तक्रारी दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.


विशेषतः ग्रामीण भागात दूध संकलनाच्या नावाखाली भेसळयुक्त दूध पुरवठ्याचे जाळे कार्यरत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. काही गावांमध्ये दूध संकलन केंद्रांमधून भेसळयुक्त दूध बाजारात पोहोचत असल्याची माहिती प्रशासनाकडे आली असून त्याचीही चौकशी सुरू आहे.


अन्नभेसळ हा नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याशी थेट संबंधित गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. भेसळीबाबत कोणाकडेही माहिती किंवा पुरावे असल्यास त्यांनी गोपनीय पद्धतीने अन्न व औषध प्रशासन तसेच स्थानिक माध्यमांकडे माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागातूनच अन्नभेसळीच्या जाळ्यावर प्रभावी आळा घालता येणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments