Type Here to Get Search Results !

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; अवैध लाकूड वाहणारा ट्रक जप्त, चालकासह दोघांविरुद्ध वनगुन्हा


मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283



चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यात अवैध वृक्षतोड आणि लाकूड वाहतुकीच्या प्रकारांवर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैधरित्या लाकूड वाहून नेणारा ट्रक जप्त केला. चाळीसगाव–वाघळी मार्गावर संशयावरून थांबविण्यात आलेल्या ट्रकमधून मोठ्या प्रमाणात लिंब, बाभूळ आणि जळाऊ लाकूड आढळून आले. संबंधित लाकडाच्या वाहतुकीसाठी कोणतीही वैध परवानगी चालकाकडे नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी ट्रक जप्त करून पुढील कारवाईसाठी वन विभागाच्या ताब्यात दिला. या प्रकरणी ट्रक चालक आणि मालकाविरुद्ध वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अवैध वृक्षतोडीच्या रॅकेटचा तपास सुरू करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, १५ जुलै रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजेच्या सुमारास चाळीसगाव ग्रामीण पोलिसांचे पथक नियमित गस्त घालत होते. त्यावेळी वाघळीकडून चाळीसगावच्या दिशेने येणारा एमएच-१९, झेड-३७३३ क्रमांकाचा ट्रक संशयास्पद हालचाली करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पथकाने तात्काळ ट्रक थांबवून त्याची सखोल तपासणी केली.


तपासणीदरम्यान ट्रकमध्ये सुमारे सात ते आठ घनमीटर लिंब, बाभूळ आणि जळाऊ लाकूड भरलेले असल्याचे आढळले. पोलिसांनी चालकाकडे लाकूड वाहतुकीसाठी आवश्यक असलेली परवानगी, वाहतूक पास आणि इतर कागदपत्रांची मागणी केली. मात्र, कोणतेही वैध दस्तऐवज सादर करता आले नाहीत. त्यामुळे हे लाकूड अवैधरित्या वाहून नेले जात असल्याचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने ट्रक ताब्यात घेऊन संपूर्ण मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी चाळीसगाव वन विभागाकडे सुपूर्द केला.


या प्रकरणी घोडेगाव येथील वनपाल सागर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक कामरोद्दीन शरफोद्दीन शेख (रा. मालेगाव) तसेच ट्रक मालक फरजान अन्सारी यांच्याविरुद्ध वन अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन विभाग आणि पोलिसांकडून लाकूड नेमके कुठून तोडण्यात आले, त्याची वाहतूक कोणाच्या सांगण्यावरून करण्यात येत होती आणि ते कुठे पोहोचविण्यात येणार होते, याचा तपास सुरू आहे.


दरम्यान, गेल्या काही महिन्यांत चाळीसगाव तालुक्यात अवैध वृक्षतोड आणि लाकूड वाहतुकीविरोधात झालेल्या अनेक कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेली वाहने आणि संशयितांचा संबंध मालेगाव परिसराशी असल्याचे समोर आल्याने या अवैध व्यवसायामागे संघटित जाळे कार्यरत असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. वनसंपत्तीची मोठ्या प्रमाणात होणारी हानी, पर्यावरणावर होणारे परिणाम आणि शासनाच्या महसुलाचे नुकसान या पार्श्वभूमीवर या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मागणी जोर धरत आहे.


स्थानिक नागरिकांच्या मते, ग्रामीण पोलिसांनी योग्य वेळी संशयित ट्रक अडवून कारवाई केली नसती, तर मोठ्या प्रमाणातील हे लाकूड कोणत्याही अडथळ्याविना पुढे नेण्यात आले असते. त्यामुळे पोलिसांच्या सतर्कतेचे परिसरातून कौतुक होत आहे. तसेच वन विभागानेही अशा प्रकारच्या अवैध वृक्षतोडीवर सातत्याने लक्ष ठेवून संयुक्त कारवाया वाढवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


चाळीसगाव तालुक्यात वाढत्या अवैध वृक्षतोडीच्या घटनांमुळे पर्यावरण संवर्धनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वनसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी पोलिस आणि वन विभागाने समन्वयाने अधिक प्रभावी कारवाई करणे, तसेच अवैध वृक्षतोडीमागील मुख्य सूत्रधार, लाकूड खरेदीदार आणि वाहतूक साखळीचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची भावना पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments