Type Here to Get Search Results !

एमआयडीसीत अन्न व औषध प्रशासनाचा मोठा धाडसी छापा; १२.१५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांना अटक

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283



जळगाव : जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध साठ्यावर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत तब्बल १२ लाख १५ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. या कारवाईमुळे जळगावातील अवैध गुटखा तस्करीच्या रॅकेटला मोठा धक्का बसला असून, वकार शेख जब्बार शेख (वय ३२) आणि धीरज मिश्रा (दोघे रा. शाहूनगर, जळगाव) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.


अन्न व औषध प्रशासनाला एमआयडीसीतील एम-१२४ सेक्टरमधील एका गोदामात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा साठवून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर सहआयुक्त (अन्न) दिनानाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंके आणि आकाश बोराडे यांनी पथकासह संबंधित गोदामावर अचानक छापा टाकला.


छापेमारीदरम्यान गोदामात मोठ्या प्रमाणावर 'गोवा' ब्रँडचा प्रतिबंधित गुटखा साठवून ठेवलेला आढळून आला. अधिकाऱ्यांनी संपूर्ण मालाची तपासणी करून पंचनामा केला. या कारवाईत प्रत्येकी ७५ पाऊच असलेली ३,३०० पाकिटे तसेच प्रत्येकी २६ पाऊच असलेली १,५०० पाकिटे, अशी एकूण ४,८०० पाकिटे जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या गुटख्याची एकूण बाजारभावानुसार किंमत १२ लाख १५ हजार रुपये असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली.


या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईनंतर पोलिसांनी संशयित वकार शेख आणि धीरज मिश्रा यांना तातडीने अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक कृष्णा पाटील करीत असून, प्रतिबंधित गुटखा नेमका कुठून आणण्यात आला, तो कोणाला विकला जाणार होता आणि या अवैध व्यवसायामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे.


प्राथमिक तपासात संशयितांनी हा प्रतिबंधित गुटखा भाडेतत्त्वावरील गोदामात साठवून ठेवला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित गोदाम मालकाला या अवैध साठ्याची माहिती होती का, त्याचा या व्यवहारात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे का, याचाही तपास करण्याची मागणी फिर्यादीत करण्यात आली आहे.


याशिवाय अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणाचा तपास केवळ गुटखा जप्तीपुरता मर्यादित न ठेवता, या संपूर्ण रॅकेटमागील पुरवठादार, उत्पादक, वाहतूकदार, विक्रेते आणि आर्थिक साखळी उघड करण्याची मागणी केली आहे. संघटित पद्धतीने सुरू असलेल्या या अवैध व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होत असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्या अनुषंगानेही तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस विभागाने संयुक्तपणे कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली असून, जळगावातील ही कारवाई त्याचाच एक भाग मानली जात आहे. या धडक कारवाईमुळे अवैध गुटखा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, आगामी काळात अशा प्रकारच्या कारवाया आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments