मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
जळगाव : नशिराबाद पोलिसांनी अवैध गोमांस विक्रीविरोधात मोठी कारवाई करत सुमारे २५ किलो गोवंशाचे मांस जप्त केले असून एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई २४ जुलै २०२६ रोजी सकाळी करण्यात आली. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईमुळे बेकायदेशीर मांस विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फातिमा नगर येथील ३६ खोल्या परिसरात बंद टपरीच्या आडोशाला गोवंशाचे मांस बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तातडीने घटनास्थळी धाड टाकली.
२४ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.४५ वाजता पोलिसांनी छापा टाकला असता, मुक्तार जमाल कुरेशी (वय ४०) व परवीन मुक्तार कुरेशी (रा. फातिमा नगर, जळगाव) हे अंदाजे ₹५,००० किंमतीचे २५ किलो गोवंशाचे सदोष मांस बेकायदेशीररीत्या कत्तल करून विक्रीसाठी बाळगत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष मांसाचा साठा जप्त करून पुढील कायदेशीर कारवाई केली.
या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात सी.सी.टी.एन.एस. गुन्हा रजिस्टर क्रमांक २१२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम २७५ व ३२५ तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, १९७६ चे कलम ५ (सी), ९ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान पुरुष आरोपी मुक्तार जमाल कुरेशी याला अटक करण्यात आली असून, अन्य संबंधितांचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या मोहिमेस पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारवाले यांचे मार्गदर्शन लाभले. कारवाई यशस्वी करण्यासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, सागर बिडे, भरत झांबिवकर, पंकज सोनवणे, प्रवीण लोहार तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
अवैध गोमांस विक्री व पशुसंवर्धनाशी संबंधित कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले असून, नशिराबाद पोलिसांची ही कारवाई त्याचाच एक भाग असल्याचे सांगण्यात आले. या उल्लेखनीय कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले आहे. प्रकरणाचा पुढील तपास नशिराबाद पोलीस करीत असून, अवैध मांस विक्रीच्या साखळीचा उलगडा करण्याच्या दृष्टीने चौकशी सुरू आहे.

Post a Comment
0 Comments