मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
मुक्ताईनगर : तालुक्यात प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात मुक्ताईनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ८ लाख २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखूचा मोठा साठा, इनोव्हा कार आणि मोबाईल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गुटखा तस्करांचे धाबे दणाणले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मुक्ताईनगर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, एका इनोव्हा कारमधून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने पथक तयार करून परिसरात नाकाबंदी केली. १८ जुलै रोजी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास पूर्णाड फाट्याजवळील हॉटेल आरंभ परिसरात संशयित इनोव्हा (क्र. एमएच २८ एके ८९९९) अडविण्यात आली.
वाहनाची सखोल तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ वाहन ताब्यात घेऊन चालकाला अटक केली. तपासणीत वाहनातून ४ लाख ३ हजार २०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, १६ हजार ८०० रुपयांची सुगंधित तंबाखू, ५०० रुपयांचा मोबाईल आणि ४ लाख रुपये किमतीची इनोव्हा कार असा एकूण ८ लाख २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) जळगावचे अधिकारी योगराज सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून शेख सलीम शेख इस्माईल (वय ५९, रा. चिखली, जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून हा प्रतिबंधित माल कुठून आणण्यात आला होता आणि तो कुठे पोहोचविण्यात येणार होता, याचा तपास पोलीस करीत आहेत. तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
मुक्ताईनगर पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्री व वाहतुकीविरोधात प्रशासनाने अशाच कठोर कारवाया सातत्याने सुरू ठेवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पोलिसांनीही अशा बेकायदेशीर व्यवसायाला आळा घालण्यासाठी गुप्त माहितीच्या आधारे कारवाया अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

Post a Comment
0 Comments