Type Here to Get Search Results !

पाटणादेवी जंगलातून चंदनतस्कर गजाआड; न्यायालयाकडून दोन दिवसांची वनकोठडी

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283



चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी वनक्षेत्रात अवैधरित्या चंदन वृक्षांची तोड करणाऱ्या एका चंदनतस्कराला वनविभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. या कारवाईत आरोपीच्या ताब्यातून चंदनाचे लाकूड आणि अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.


अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संजय दामू मधे (रा. काळदरी, ह.मु. अबला-टाकरवाडी, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे आहे. वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा वनक्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक ३०६ मध्ये चंदन वृक्षांची बेकायदेशीर तोड होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी परिसरात गस्त आणि विशेष नजर ठेवण्यास सुरुवात केली होती.


२९ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे १०.३० वाजेच्या सुमारास वनविभागाचे पथक नियमित गस्त घालत असताना आरोपी चंदन वृक्षाची तोड करताना रंगेहात आढळून आला. पथकाने तत्काळ त्याला ताब्यात घेत घटनास्थळावरून चंदनाचे लाकूड आणि इतर साहित्य जप्त केले. त्यानंतर आरोपीविरुद्ध वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.


ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) एम.के. रहाटवळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल टी. एन. गादीचव्हाण, के. देशमुख, एस. एम. जाधव, व्ही. जे. सोनवणे तसेच श्रीमती आर. आर. सूर्यवंशी यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने पुढील तपासासाठी त्याला दोन दिवसांची वनकोठडी सुनावली. या प्रकरणाचा अधिक तपास वनविभागाकडून सुरू असून, या तस्करीमागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. वनसंपत्तीची अवैध तोड आणि तस्करी रोखण्यासाठी अशा कारवाया भविष्यातही सुरू राहणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments