Type Here to Get Search Results !

५०० रुपयांत थायलंड सहलीचे आमिष; १२ महिलांना गंडा घालण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांच्या नावाचा गैरवापर

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283


छत्रपती संभाजीनगर : अवघ्या ५०० रुपयांत थायलंडची आठ दिवसांची सहल घडवून आणण्याचे आमिष दाखवत १२ हून अधिक महिलांची फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरात समोर आला आहे. या प्रकरणात ७१ वर्षीय संशयित महिलेने पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या नावाचा गैरवापर केल्याचा आरोप असून, या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, जवाहर कॉलनी परिसरातील काही महिलांना समतानगर येथील संशयित शोभा उत्तम देवकर हिने एकत्र केले. तिने महिलांना, “पालकमंत्री संजय शिरसाट नागरिकांना थायलंडच्या सहलीवर पाठवत आहेत. प्रत्येक महिलेने केवळ ५०० रुपये भरायचे असून, सहलीचा उर्वरित खर्च पालकमंत्री करणार आहेत,” असे सांगितल्याची माहिती आहे.


अवघ्या ५०० रुपयांत परदेशातील आठ दिवसांची सहल मिळणार असल्याने महिलांना या प्रस्तावावर विश्वास बसला. संशयित महिलेने विश्वास संपादन करण्यासाठी महिलांकडून आधारकार्ड आणि छायाचित्रे जमा केल्याचेही समोर आले आहे. तसेच, या सहलीसाठी आपल्या परिचयातील आणखी महिलांना सहभागी करून घेण्याचे आवाहन तिने केले.


त्यानंतर ३ ऑगस्ट रोजी १२ महिलांकडून प्रत्येकी ५०० रुपये, असे सुमारे ६ हजार रुपये जमा करण्यात आल्याची माहिती आहे. सहलीसाठी ७ ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, निर्धारित दिवशी सहल निघाली नाही. याबाबत महिलांनी विचारणा केली असता संशयित महिलेने “एक विमान आधीच निघून गेले आहे. आता आपण दुसऱ्या विमानाने जाऊ,” असे सांगत आणखी काही दिवसांची मुदत मागितल्याचे सांगण्यात येते.


सहल पुढे ढकलली जात असल्याने महिलांना संशय आला. त्यांनी या प्रकाराची माहिती संबंधित व्यक्ती तसेच प्रशासनापर्यंत पोहोचवली. हा प्रकार पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.


यानंतर जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन कुंभार यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला. पोलिसांनी एका महिला पोलीस अंमलदाराला साध्या वेशात संशयित महिलेच्या संपर्कात पाठवले. विशेष म्हणजे, संशयित महिलेने त्या महिला पोलिस अंमलदारालाही “५०० रुपये भरा, तुम्हालाही थायलंडला घेऊन जाते,” अशी ऑफर दिल्याचे तपासात समोर आल्याची माहिती आहे.


या प्रकारामुळे संशयित महिलेचा दावा आणि सहलीचे आमिष याबाबत पोलिसांचा संशय अधिक बळावला आहे. महिलांकडून जमा केलेली रक्कम, कागदपत्रे आणि पालकमंत्र्यांच्या नावाचा वापर यासंदर्भात पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. या प्रकरणात नेमकी किती महिलांकडून पैसे घेण्यात आले, त्यांच्याकडून कोणती कागदपत्रे जमा करण्यात आली आणि या प्रकारामागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही तपास केला जात आहे.


अवघ्या ५०० रुपयांत परदेश सहलीचे आमिष दाखवून महिलांना जाळ्यात ओढण्याचा हा प्रकार समोर आल्याने नागरिकांनी अशा आकर्षक योजनांबाबत सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments